Vinayak Raut: पत्रकार मृत्यू प्रकरण, विनायक राऊतांचा नारायण राणेंवर गंभीर आरोप

0

मुंबई,दि.११: Vinayak Raut On Narayan Rane: पत्रकार मृत्यूप्रकरणी शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर गंभीर आरोप केला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर येथे रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा ६ फेब्रुवारीला अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर वारीसे यांना कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, ७ फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला.

विनायक राऊत यांचा नारायण राणेंवर आरोप | Vinayak Raut On Narayan Rane

याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आली आहे. पण, हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते ( ठाकरे गट ) विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर (Narayan Rane) गंभीर आरोप केला आहे.

वारिसेंच्या हत्येचा पोलिसांनी योग्य तो तपास करावा | Vinayak Raut

वृत्तवाहिनीशी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, “रिफायनरी आणि जमीन दलालांच्या विरोधात मागच्या अनेक वर्षापासून आवाज उठवणारे शशिकांत वारीसे यांचा घातपात झाला आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता, न्यायासाठी लढणारे म्हणून वारिसेंचा उल्लेख होता. वारिसेंच्या हत्येचा पोलिसांनी योग्य तो तपास करावा,” अशी मागणी विनायक राऊतांनी केली आहे.

पंढरीनाथ आंबेरकर हा सराईत गुंड

“पंढरीनाथ आंबेरकर हा सराईत गुंड आहे. त्याने यापूर्वी असे अनेक प्रयत्न केले आहेत. २०२० साली कुंभवडेला मनोज महेकर या तरुणाच्या अंगावरही गाडी घालत ठार करण्याचा प्रयत्न केला होता. कारण, त्याचे वडील रिफायनरी विरोधी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत,” असं विनायक राऊतांनी सांगितलं.

“आंबेरकर हा रिफायनरीच्या पैशांवर पोसणारा गुंड आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्यांचा कायमस्वरून बंदोबस्त करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची आहे. वारिसेंची हत्या घडवून आणली असून, याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे,” असेही विनायक राऊतांनी म्हटलं.

“यापूर्वी सिंधुदुर्गमध्ये जिल्हा नियोजनची बैठक झाली होती. भाजपाचे जबाबदार केंद्रीय नेते यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीत मालवचं सी-वर्ल्ड आणि रिफायनरी याच्याविरोधात येणाऱ्यांची गय करू नका; प्रसंगी पोलिसांचा वापर करून प्रकल्प राबवा, असं वक्तव्य केलं होतं. तसेच, हा गुंडगिरी करणारा आंबेरकर नारायण राणे किंवा निलेश राणेंबरोबर असतो. त्यांच्या चिथावणीमुळे वारीसेसारख्या पत्रकाराची हत्या करण्याचं षडयंत्र आंबेकरने आखलं,” असा गंभीर आरोप विनायक राऊतांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here