सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडून अजूनही लोकांना न्यायाची अपेक्षा: संजय राऊत

0

नवी दिल्ली,दि.१५: शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे परिवार, शिवसेनेच्या प्रत्येकाबाबत खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मग संपत्तीचा किंवा व्हिडीओ मॉर्फींगचा विषय असो. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करणं या एकमेव हेतूनं राज्याचं राजकारण सुरू आहे. पण, देशाच्या न्यायालयातील न्याय मेला नाही. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडून अजूनही लोकांना न्यायाची अपेक्षा आहे, असं शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देशात फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करत…

“देशात फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करत ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून अटक करण्यात येते. सत्ताधारी पक्षाचे नेते दुधाने अंघोळ करतात का? आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि नारायण राणे तुरुंगात असायला हवे होते, अशी भाजपाची भूमिका होती. आज त्यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्री आहेत,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

किरीट सोमय्यांसारखे भंपक लोक…

“दिल्लीत मनीष सिसोदीय, सत्येंद्र जैन, महाराष्ट्रात अनिल देशमुख, मी, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, अनिल परब, सदानंद कदम यांच्या राजकीय सूडबुद्धीने कारवाया सुरु आहे. भीमा पाटस साखर कारखान्याचं प्रकरण समोर आणलं. मात्र, संजय राऊत आरोप करतात म्हणून तो पुरावा असू शकत नाही, असं त्याचं मत आहे. मी सर्व पुराव्यासह दिलं आहे. मग किरीट सोमय्यांसारखे भंपक लोक कोणत्या आधारावर आरोप करतात. कशाच्या आधारावर चौकश्या केल्या जातात,” असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

“क्राउड फंडीग प्रकरणात साकेत गोखलेला अटक करण्यात येते. क्राउट फंडीग प्रकरणाताच आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या मोठे पैसे गोळा करतात, त्यांना क्लीनचिट मिळते. याचा अर्थ स्पष्ट आहे, सरकारला प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करत गुन्हे दाखल करायचे,” असा आरोप संजय राऊतांनी सरकारवर केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here