Saamana Rokhthok | ‘लोकांना बुवा महाराज अंगारे-धुपारे मंदिर मशीद कथा वाचक धर्म मेळे यांत गुंग ठेवून…’

0

मुंबई,दि.९: Saamana Rokhthok: हिंदुस्थान इंग्रजांचा गुलाम झाला. कारण विज्ञानाची कास सोडून अंधश्रद्धा, भोंदुगिरी, जादुटोणा यामागे जनता लागली. भाजपाने ’सावरकर गौरव यात्रा’ काढली. सावरकरांचा विचार विज्ञानवादीच होता. त्या विज्ञानवादाला मूठमाती देऊन ‘मोदी पक्ष’ पुन्हा देशाला अंधश्रद्धा, बुवाबाजीच्या विहिरीत ढकलत आहे. अशाने देश गुलामच होईल, असे म्हणत शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी सामना ‘रोखठोक’मधून भाजपावर टीकास्र सोडले आहे.

हिंदुस्थान गुलाम का झाला? | Saamana Rokhthok

संजय राऊत म्हणाले, “हिंदुस्थान गुलाम का झाला? यावर आतापर्यंत अनेक चर्चा घडल्या असतील. पण हिंदुस्थानने गुलामी का पत्करली याचे उत्तर देशातील आजच्या भाजपा राजवटीत आहे. विज्ञानाची, आधुनिकतेची कास सोडून देशाला भोंदू बाबागिरीच्या मार्गाने नेणे हाच गुलामीचा मार्ग आहे. देशी लोकांत कमालीची वाढलेली अंधश्रद्धा, धर्मांधता, बुवागिरी यामुळे जनतेला गुलाम करून देश ताब्यात घेणे इंग्रजांना शक्य झाले.”

“मोदी यांच्या नेतृत्वाखालचा भारतीय जनता पक्ष देश ताब्यात ठेवण्यासाठी तोच ब्रिटिश मार्ग अंगीकारत आहे. लोकांना बुवा, महाराज, अंगारे-धुपारे, मंदिर, मशीद, कथा वाचक, धर्म मेळे यांत गुंग ठेवून मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करायचे व त्याच ‘धुंद’ वातावरणात निवडणुका जिंकायच्या. जाती व धर्मात भांडणे लावण्याचे काम इंग्रजांनी केले. लोकांना भांडत ठेवले व इंग्रज देश लुटत राहिले. आता वेगळे काय सुरू आहे?,” अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली आहे.

आसाराम बापूंचा भाजपाने पुरेपूर वापर करून घेतला

“आसाराम बापूंचा भाजपाने पुरेपूर वापर करून घेतला. त्यांच्या सत्संगात मोदींपासून सगळ्यांनी वारंवार हजेरी लावली. नाचले व गायले. रामदेव बाबालाही प्रचारात आणले. साधू परिषदांना हवा दिली. आता कुणी एक बागेश्वर बाबांना उभे करून त्यांच्या माध्यमांतून गर्दी गोळा केली जात आहे,” असं संजय राऊत सांगितले.

“हे बागेश्वर बाबा मुंबईत आले व त्यांनी शिर्डीच्या साईबाबांवर वादग्रस्त विधान केले. साईबाबांना मी भगवान मानत नाही असे ते महाशय म्हणाले. ‘मला देव माना’ असे साईबाबा कधीच म्हणाले नाहीत, पण बागेश्वर बाबा लोकांना भूलथापा देऊन जी देवगिरी करू पाहत आहेत त्यामुळे अज्ञान, अंधश्रद्धेचाच ‘वात’ सुरू झाला. कोट्यवधींची उलाढाल या माध्यमांतून सुरू आहे व हे महाराज आज छुपे प्रचारक असले तरी उद्याचे भाजपाचे मुख्य प्रचारक ठरू शकतात. अशा बुवा-महाराजांच्या खांबावर आजचा भाजपा उभा आहे व त्यामुळे देशाचा प्रवास विज्ञानातून पुन्हा भूतप्रेत, जादूटोणा व अंधश्रद्धेकडे सुरू झाला आहे,” असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे.

“भारतीय संसदेचे आजचे रूप-रंग आज पालटले आहे. संसदेतून आधुनिक आणि विज्ञान हद्दपार झाले असून तेथे अनेक बाकांवर आता जटाधारी, दाढीवाले बुवा-महाराज हे भगव्या वस्त्रांत बसलेले दिसतात. त्यातले काही महाराज लोक उघड्या अंगाने बसतात. हे पाहायला विचित्र वाटते. संसदेची प्रतिष्ठा त्यात कमी होते. नेहरूंचा विज्ञानवाद, वीर सावरकर व डॉ. आंबेडकरांच्या आधुनिक विचारांचा हा पराभव आपल्याच संसदेत झालेला दिसतो,” असेही संजय राऊत म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here