Ajit Pawar On EVM: अजित पवारांचे EVM मशीनवर मोठं वक्तव्य, चर्चांना उधाण

Ajit Pawar On EVM: ईव्हीएम मशीन वर विश्वास असल्याचे वक्तव्य अजित पवारांनी केले

0

पुणे,दि.9: Ajit Pawar On EVM: अजित पवारांच्या EVM वरील वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे. देशातील निवडणुकांमध्ये मतदानासाठी EVM मशिनवर आक्षेप घेत विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असली तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपला ईव्हीएमवर विश्वास असल्याचे म्हटले आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतच एकवाक्यता नाही का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

जर EVM मध्ये घोळ करता आला असता तर…| Ajit Pawar On EVM

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या नेत्यांची एक बैठक पार पडली होती. या बैठकीत ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आज पुण्यात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माझा ईव्हीएम मशीन वर विश्वास असल्याचे वक्तव्य केले. जर EVM मध्ये घोळ करता आला असता तर देशातील अनेक राज्यात विरोधी पक्ष सत्तेत आलेच नसते, असेही अजित पवार यांनी म्हटले. एवढ्या मोठ्या देशात एखादी गडबड कुणी करु शकत नाही असंही त्यांनी म्हटले. पराभवाचे कारण काही लोकं EVM वर ढकलून देत असल्याचेही पवार यांनी म्हटले.

राजकारणात अजुन शिक्षणाची कुठलीही अट आली नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या पदवीबाबत प्रश्न (PM Narendra Modi Education Degree) उपस्थित करण्यात येत असताना अजित पवार यांनी राजकारणात शिक्षणाचा मुद्दा गौण असल्याचे म्हटले. राजकारणात अजुन शिक्षणाची कुठलीही अट आली नाही. आता नऊ वर्षानंतर पंतप्रधान मोदी यांच्या पदवीचा मुद्दा काढून काय उपयोग होणार आहे? असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला. मोदी यांच्या नावावर त्यांच्या पक्षाने (BJP) निवडणूक जिंकल्यात असेही पवार यांनी म्हटले.

ज्यांना जिथे देवदर्शनाला जायची इच्छा आहे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री, शिवसेना-शिंदे गट, भाजपचे आमदार अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. याबाबत अजित पवार यांना विचारले असता, त्यांनी म्हटले की त्यांच्या या दौऱ्याला शुभेच्छा आहेत. ज्यांना जिथे देवदर्शनाला जायची इच्छा आहे, तिथं त्यांनी जावं पण त्याचा बाऊ करू नये. फक्त मंत्री तिकडे जात असताना ज्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे त्याचे भान ठेवावे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई आदी मुद्देही लक्षात ठेवावे असेही अजित पवार यांनी म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here