मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले निलंबित

0

जळगाव,दि.१५: मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकालेना निलंबित करण्यात आले आहे. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणाची पोलीस दलाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. मराठा समाजाचा वाढता प्रक्षोभ लक्षात घेत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर यांनी हे निलंबनाच्या आदेश पारित केले आहेत.

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याने मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या प्रकरणावरून बकाले याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मराठा समाजातील विविध संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत बकाले याची तत्काळ बदली करण्यात आली होती. तसंच दुसऱ्या दिवशी बकाले याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार असून पोलीस उपाधीक्षक यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतर सविस्तर अहवाल लवकरात लवकर पाठवावा, असंही विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी शेखर यांनी पारित केलेल्या आदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, किरणकुमार बकाले याने केलेलं वक्तव्य हे पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे असून अशा प्रवृत्तींना पाठीशी घातले जाणार नाही. बकाले याच्यावर कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून कायदा व सुव्यवस्था अडथळा निर्माण होईल, असं कुठलंही कृत्य मराठा समाजाने करू नये, तसंच पोलीस दलास सहकार्य करावं, असं आवाहनही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here