पोलीस हवालदाराची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता

0

सोलापूर,दि.१२: न्यायालयाने पोलीस हवालदाराची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. यातील हकिकत अशी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस हवालदार हनुमंत जाधव यांनी तक्रारदारांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई मध्ये मदत केली तसेच त्याच्याविरुद्ध आलेल्या तक्रारी अर्जामध्ये मदत करण्यासाठी दि. १/१०/२०१६ रोजी रक्कम रु. १०,०००/- लाचेची मागणी केलेली होती. त्यामुळे दि. २/१०/२०१६ रोजी पोलीस हवालदार जाधव यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे तक्रारी अर्ज दिलेला होता.

सदरची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरोपी जाधव यांचेकडून लाचेसंदर्भात मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील सापळ्याची कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येऊन लाचेची रक्कम स्वीकारताना टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस हवालदार हनुमंत जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आलेले होते. त्यानंतर आरोपी हनुमंत जाधव यांच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम ७, १३(१)(ड) सह १३(२) अन्वये दि. २/१०/२०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

त्यानंतर आरोपी विरुद्ध बार्शी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्यात आलेले होते. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले. यात आरोपी जाधव यांच्यातर्फे ॲड. निलेश जोशी यांनी युक्तिवाद करून सरकारतर्फे तपासण्यात आलेले साक्षीदारांच्या साक्षीमध्ये महत्त्वपूर्ण व ठळक विसंगती व तफावती असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच सरकार पक्षातर्फे देण्यात आलेला पुरावा हा आरोपीस शिक्षा करण्याइतपत पुरेसा नसल्याचे तसेच तक्रारदाराने त्याच्यावर होणारी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी पोलीस हवालदार हनुमंत जाधव यांना लाच प्रकरणात खोटेपणाने गुंतवले असल्याचे न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून दाखवून देवून सर्वोच्च न्यायालयाचे व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले.

सदर प्रकरणात ॲड. निलेश जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस हवालदार हनुमंत रंगनाथ जाधव यांची लाचलुचपत कायद्याचे कलम ७, १३(१)(ड) सह १३(२) मधून बार्शी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. डी. अग्रवाल यांनी निर्दोष मुक्तता केलेली आहे. सदर प्रकरणात आरोपी जाधव यांच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. कैलास बडवे, ॲड. मल्लिनाथ बिराजदार, ॲड. पैगंबर सय्यद, ॲड. राणी गाजूल, ॲड. ओंकार परदेशी, ॲड. सोनाली कोंडा यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here