सोलापूर,दि.५: तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना सदर बझार पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई शनिवारी (दि.४) रात्री उशिरा करण्यात आली.
सर्जेराव शंकर पाटील (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या सदर बझार पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकाचे नाव आहे. तक्रारदाराविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जानुसार तक्रारदारावर कोणतीही कारवाई न करता सदर प्रकरणामध्ये सहकार्य करण्यासाठी पोलीस नाईक पाटील यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडीनंतर पाच हजार स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदवली. पाच हजारांपैकी पहिला हप्ता दोन हजार रुपये सदर बझार पोलीस ठाण्यामध्ये स्वीकारत असताना पोलीस नाईक पाटील यास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक तसेच पोलीस कर्मचारी कोळी, घुगे, जानराव, सन्नके, मुल्ला, सुरवसे यांनी केली.