नवी दिल्ली,दि.22: कुवेतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना तेथील सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ देऊन सन्मानित केले. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. याआधी 19 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले आहे. या यादीत समाविष्ट होणारा हा 20 वा देश आहे.
भारत आणि कुवेतमधील चांगले संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ‘ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ हा राष्ट्रप्रमुख आणि परदेशी सार्वभौम आणि परदेशी राजघराण्यातील सदस्यांना मैत्रीचा संकेत म्हणून दिला जातो. पीएम मोदींपूर्वी बिल क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश यांसारख्या परदेशी नेत्यांनाही ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता जागतिक स्तरावर सर्वाधिक आहे. एका सर्वेक्षणात त्यांना सर्वाधिक लोकप्रिय नेता घोषित करण्यात आले. इतकेच नाही तर अनेक देशांनी त्यांना त्यांच्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. प्रादेशिक आणि जागतिक स्तरावरील त्यांच्या नेतृत्वासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2014 पासून 20 देशांच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, ज्यात संयुक्त राष्ट्रांच्या सर्वोच्च पर्यावरण पुरस्काराचा समावेश आहे.