आमच्या वाटेला आलात तर सोडणार नाही, छेडोगे तो छोडेंगे नही: मतीन शेखानी

0

मुंबई,दि.१६: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध केला आहे. आमचा प्रार्थनेला विरोध नाही पण जेव्हा धर्म स्थापन झाला तेव्हा काय भोंगा होता का? असे म्हणत मशिदींवरील भोंगे ३ मे पर्यंत काढावेत अन्यथा आम्ही लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, भोंग्यांवरून झालेल्या वादानंतर पीएफआयने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी दिली आहे. पीएफआयचे मुंब्य्रातील अध्यक्ष मतीन शेखानी यांनी ही धमकी दिली आहे. देशामध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. आमच्या वाटेला आलात तर सोडणार नाही हा आमचा नारा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मुंब्रामधील पीएफआयचे अध्यक्ष मतीन शेखानी यांनी मध्य प्रदेश राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये रामनवमीच्या शोभायात्रांमध्ये झालेल्या हिंसाचाराचा विरोध केला आहे. मतीन शेख यांनी सांगितले की, मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. काही लोक मुंब्य्रातील वातावरण बिघडवत आहेत. ‘छेडोगे तो छोडेंगे नही’ हे आमचे घोषवाक्य आहे. तसेच भोंग्यावरून होणाऱ्या अजानबाबत त्यांनी सांगितले की, एकाही भोंग्याला हात लावला तर पीएफआय सर्वात समोर असेल. दरम्यान, पीएफआयचे आंदोलन संपल्यानंतर मुंब्रा पोलिसांना पत्रकही देण्यात आले आहे.

मनसेकडून मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारला ३ मे पर्यंतचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. दरम्यान, आज मनसेकडून हनुमान मंदिरांमध्ये हनुमाच चालिसा पठण केली जाणार आहे. तर मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज संध्याकाळी पुण्यामध्ये सार्वजनिक हनुमान चालिसा पठणामध्ये सहभागी होणार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here