या देशातील न्याययंत्रणेवर लोकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे: सुषमा अंधारे

0

मुंबई,दि.1: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केल्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आमचा संविधानावर विश्वास आहे, या देशातील न्याययंत्रणेवर लोकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे असे म्हटले आहे. पक्षासाठी छातीचा कोट करून ईडी, सीबीआयशी लढणारे, लढाऊ स्वाभिमानी बाणा जपणारे संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई सूडबुद्धीनेच केली आहे. आमचा सनदशीर लढाईवर विश्वास आहे.

सकाळी 6 पासून सुरू झालेल्या कारवाईला संपूर्ण सहकार्याची भूमिका घेतली. परंतु याचा अर्थ शिवसेना शांत बसणाऱ्यांपैकी आहे असं नाही. कारण मातोश्रीवरून आदेश निघाल्यास महाराष्ट्रात काय वातावरण होईल यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही असा इशारा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला आहे. 

सुषमा अंधारे म्हणाल्या की,  शिवसेनेसाठी संजय राऊत आक्रमकपणे लढाई करत होते. आमचा संविधानावर विश्वास आहे. या देशातील न्याययंत्रणेवर लोकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे. संजय राऊतांच्या पाठिशी संपूर्ण पक्ष आहे. आम्ही ही लढाई जिंकणारच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा अखंड महाराष्ट्रावर यापुढेही असाच फडकत राहणार आहे. आम्ही शिवसैनिक संजय राऊतांसाठी लढत राहणार आहे असं त्यांनी सांगितले. 

संजय राऊत यांच्यावरील कारवाई हा लोकशाहीचा, विरोधकांचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. जो हिंदूंचा, मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा आवाज बुलंद करतोय, त्याचाच गळा घोटण्याचा डाव आहे. शेवटच्या क्षणापर्यंत या जुलूमशाहीविरोधात लढत राहू आणि महाराष्ट्राची माती काय असते, तिथला पराक्रम काय असतो, हे दाखवून देऊ, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here