औरंगाबाद,दि.१०: महाराष्ट्रात लसीकरण मोहीम सुरू आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून अनेक जिल्ह्यात लसीकरण जास्त प्रमाणात झाले आहे. तर काही जिल्ह्यात लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाला आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. ‘ग्राहक व नागरिकांकडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच त्यांना सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात,’ असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपधारक, गॅस एजन्सी, रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांना दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी १० नोव्हेंबरपासून ते पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असेही त्यांनी नमूद केले.
बाजार समिती येथे शेतकऱ्यांचा माल स्वीकृत करण्यात यावा, व लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कृषी मालाची देयके अदा करण्यापूर्वी लस प्रमाणपत्राबाबत खात्री करावी; तसेच पेट्रोल पंपावर बाहेरील जिल्ह्यातील व्यक्तींची यादी करावी व लसीकरण प्रमाणपत्राबत विचारणा करावी. प्रमाणपत्र नसल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण करणे बाबत सूचित करावे, असे निर्देशही देण्यात आले असून उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्ह्यात लसीकरणाबाबत अल्प प्रतिसाद असून करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ‘बीबी का मकबरा’, औरंगाबाद लेणी, अंजिठा लेणी, वेरुळ लेणी यांसह अन्य, पर्यटन स्थळाबाबत मार्गदर्शक सूचना व आदेश जारी केले आहेत. पर्यटनासंबधी सरकारी, निमशासकीय कार्यालये व खासगी आस्थापनांमध्ये जसे पर्यटन आयोजित करणाऱ्या संस्थामध्ये कार्यरत, कर्मचारी यांच्या कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख, आस्थापना प्रमुख यांनी करावी. लस घेतल्याचे प्रमाणपत्र संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करुन घ्यावे. जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर येणाऱ्या सर्व पर्यटकांना व सर्व अभ्यागतांना लसीकरणाचा किमान एक डोस झालेली नसल्यास, त्यांना पर्यटनस्थळी प्रवेश दिला जाणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.