Operation Ganga: युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने घेतला हा निर्णय

0

नवी दिल्ली,दि.28 : Operation Ganga: रशिया-युक्रेन युद्धात (Russia-Ukraine crisis) मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine crisis) पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री भारतीयांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी (Operation Ganga) युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाऊ शकतात. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया आणि किरेन रिजिजू आणि जनरल व्हीके सिंग हे युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये स्थलांतर मोहिमेचे समन्वय साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शेजारील राष्ट्रात दौरा करतील.

युक्रेन-रशिया युद्धात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी 249 जणांचे पथक आज ऑपरेशन गंगा (Operation Ganga) अंतर्गत पाचव्या उड्डाणाने नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. या सर्वांना रोमानियातील बुखारेस्ट विमानतळावरून आणण्यात आले आहे. मायदेशी परतलेल्या प्रवाशांनी युक्रेनमधून सुरक्षितपणे बाहेर काढल्याबद्दल भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

युक्रेनहून दिल्लीत पोहोचलेल्या एका विद्यार्थ्याने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “सरकारने आम्हाला खूप मदत केली आहे. भारतीय दूतावासाने शक्य ती सर्व मदत केली आहे. सर्वात मोठी समस्या म्हणजे सीमा ओलांडणे. मला आशा आहे की सर्व भारतीयांना परत आणले जाईल.” अजून बरेच भारतीय अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत.”

युक्रेन-रशिया संकटादरम्यान, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना सरकारी अधिकार्‍यांशी पूर्व समन्वय न ठेवता कोणत्याही सीमा चौक्यांवर जाऊ नये, असा सल्ला दिला आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान 15 हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना घरी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू आहे. याअंतर्गत आतापर्यंत एअर इंडियाच्या 5 फ्लाइट्सद्वारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसह 1100 हून अधिक भारतीय नागरिकांना भारतात आणण्यात आले आहे. मात्र, हजारो भारतीय अजूनही मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत.

याआधीही रोमानियाहून 219 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान शनिवारी रात्री मुंबईत पोहोचले तेव्हा विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विमानतळावर विद्यार्थ्यांचे स्वागत केले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, “युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याच्या बाबतीत आम्ही प्रगती करत आहोत. आमची टीम 24 तास काम करत असते. मी वैयक्तिकरित्या निरीक्षण करत आहे.” ते म्हणाले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी एअर इंडिया रोमानियामधील बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून उड्डाणे सुरू ठेवेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here