देशातील या गावात प्रत्येक घरात एक IAS किंवा IPS अधिकारी

0

दि.30 : IAS किंवा IPS अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र काही जणांचेच स्वप्न साकार होते. एखाद्या जिल्ह्यातून एखादा IAS किंवा IPS अधिकारी झाला असेल तर त्या जिल्ह्याला अभिमानाची गोष्ट समजली जाते. ज्या गावातून अधिकारी झाला त्या गावातील प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटतो. एखाद्या गावात प्रत्येक घरात IAS किंवा IPS अधिकारी असेल तर. उत्तर प्रदेशात एक असं गाव आहे, जिथे प्रत्येक घरामध्ये एक IAS/IPS अधिकारी आहे. माधोपट्टी असं नाव असणारं हे गाव राज्याच्या जौनपूर जिल्ह्यात आहे. हे गाव आता त्याच्या नावापेक्षाही जास्त ‘अधिकाऱ्यांचं गाव’ म्हणून प्रसिद्ध झालं आहे.

माधोपट्टी हे तसं छोटंसंच गाव आहे. गावात अवघी 75 कुटुंबं राहतात. विशेष म्हणजे इथं घरटी एक आयएएस किंवा आयपीएस अधिकारी तयार होतो. या गावात जन्म घेतला, की मुलगा असो वा मुलगी, पुढे जाऊन अधिकारी (Village of IAS and IPS officers) होणार हे नक्कीच, असंही तिथले नागरिक मिश्किलपणे म्हणतात. उत्तर प्रदेशसोबत आजूबाजूच्या इतर राज्यांना या गावाने आतापर्यंत तब्बल 47 आयएएस अधिकारी दिले आहेत. दी लखनौ ट्रिब्युनने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

या सगळ्याची सुरुवात झाली 1914 साली. या गावातल्या मुस्तफा हुसैन (Mustafa Hussain Jaunpur) यांची निवड आयएएस अधिकारी म्हणून झाली होती. पीसीएमध्ये निवड झाल्यानंतर त्यांनी ब्रिटिश सरकारसाठी काम केलं. याच काळात इंदुप्रकाश सिंह (Indu Prakash Singh village) नावाच्या एका व्यक्तीचीही आयएएस म्हणून निवड झाली होती. त्यांनी पुढे फ्रान्ससह अन्य अनेक देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिलं.

इंदुप्रकाश सिंह यांचा संपूर्ण देशात तेरावा क्रमांक आला होता. त्यांच्यानंतर या गावातून आयएएस अधिकारी निवडले जाण्याचा सपाटाच लागला. त्यांचेच चार नातेवाईकही पुढे आयएएस अधिकारी झाले. या गावातल्या विनय सिंह यांनी बिहारचे माजी सचिव म्हणून कामकाज पाहिलं आहे. त्यांनी 1955मध्ये या परीक्षेत क्रमांक मिळवला होता. त्यानंतर 1965मध्ये त्यांच्या दोन भावांनीही या परीक्षेत यश मिळवलं.

तुम्हाला वाटत असेल, की या गावातले (UP Village of officers) केवळ पुरुषच आयएएस होत आहेत, तर थोडं थांबा. या गावातल्याच उषा सिंह यादेखील आयएएस ऑफिसर झाल्या होत्या. यासोबतच, 1983मध्ये आयएएस झालेले चंद्रमौल सिंह यांच्या पत्नी इंदू सिंहदेखील त्याच वर्षी आयपीएस ऑफिसर झाल्या होत्या. केवळ अधिकारीच नाही, तर इतर क्षेत्रांतही या गावातले तरुण मागे नाहीत. गावातल्या अवघ्या 22 वर्षांच्या अमित पांडे यांची कित्येक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. अनमजय सिंह हे मनिलामध्ये वर्ल्ड बँकेत कार्यरत आहेत. तसंच, गावातले ज्ञानू मिश्रा हेदेखील भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमध्ये काम करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here