गावटी दारू बनविण्याची हातभट्टी चालवल्याप्रकरणी एकास अटकपूर्व जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.५: गावटी दारू बनविण्याची हातभट्टी चालवल्याप्रकरणी एकास न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यात हकिकत अशी की दि. २३.०८.२०२२ रोजी पोलिस नाईक रामदास मालचे, नेमणुक वळसंग पोलिस ठाणे यांना दुपारी ०५:०० वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहितीदारामार्फत अशी बातमी मिळाली की, मौजे तिल्लेहाळ, ता. दक्षिण सोलापूर येथे एका शेतामध्ये हातभट्टी दारू बनविण्याचा मोठा अड्डा चालू असून, लाखो लिटर दारू तयार होत आहे.

पोलिसांनी टाकली धाड

त्याप्रमाणे सदर वळसंग पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदर शेतामध्ये धाड टाकली असता, तेथील प्लॅस्टिकचे अनेक बॅरल तसेच गुळ व इतर तत्सम वस्तू आढळून आल्या व संशयित आरोपी रामचंद्र तावरू चव्हाण रा. तिळ्ळेहाळ तांडा, ता. दक्षिण सोलापूर हा घटनास्थळावरून पळून गेला. त्याप्रमाणे सदर संशयिताविरूध्द वळसंग पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

ॲड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज | अटकपूर्व जामीन मंजूर

सदर संशयित रामचंद्र तावरू चव्हाण यांनी अटक होण्याच्या भितीपोटी ॲड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनासाठीचा अर्ज जिल्हा न्यायालय सोलापूर येथे दाखल केला. सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर यांनी असा युक्तिवाद केला की, सदरचे शेत जेथे सदर भट्टी पोलिसांना आढळून आली हे आरोपीच्या मालकीचे नाही. तसेच पोलिसांनी फक्त संशयावरून सदर आरोपीचे नांव या खोट्या गुन्ह्यात गोवले आहे. सदरची दारू ही शरिरास अपायकारक असल्याबद्दलचा कुठलाही रासायनिक विश्लेषण अहवाल सरकार पक्षाने दाखल केलेला नाही.

सदर युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधिश भोसले यांनी सदर संशयितास अटकपूर्व जामीनावर मुक्त करण्याचे आदेश केले. यात आरोपी रामचंद्र तावरू चव्हाण तर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. प्रथमेश आदलिंगे, ॲड. फय्याज शेख, ॲड. राजू राठोड यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here