मुंबई,दि.30: महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या रुग्णांची (Omicron) संख्या वाढत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना (Covid – 19) रुग्णांची संख्याही वाढत आहे. राज्यात मुंबईत रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. गेल्या काही दिवसांमधील कोरोना रुग्णांचे आकडे पाहता मुंबई आणि पुण्यात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्याकडून तशी माहिती देण्यात आली आहे.
राज्यात बुधवारी ओमिक्रॉनच्या (Omicron) 85 रुग्णांची नोंद झाली. सध्या नव्या करोना रुग्णांच्या चाचण्यांवेळी काही नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात आहेत. पुण्याच्या आयसर संस्थेने घेतलेल्या 38 नमुन्यांच्या चाचण्यांमधून मुंबई आणि पुण्यात ओमिक्रॉन समूह संसर्ग सुरु झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आल्याची माहिती डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. विशेष म्हणजे ओमिक्रॉनची बाधा झालेल्या अनेक रुग्णांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला नसल्याचे निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात ओमायक्रॉनच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे.
ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यांना जाणवणारी लक्षणे सौम्य आहेत. या रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. ही चांगली गोष्ट असल्याचे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.
तर दुसरीकडे राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनीही महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा वेगाने प्रसार होत असल्याचे म्हटले आहे. कोरोनाचे नवे रुग्ण ओमिक्रॉन व्हेरिएंटचेच आहेत का, याबाबत निश्चित माहिती नाही. पण गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत ज्याप्रकारे डबलिंग पाहायला मिळत आहे, त्यावरुन हा ओमिक्रॉन व्हेरिएंट असावा. कारण, यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णांची संख्या इतक्या झपाट्याने वाढत नव्हती. परंतु, यामुळे लोकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (गुरुवारी) टास्क फोर्ससोबत बैठक होणार आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली. टास्क फोर्ससोबतच्या आजच्या बैठकीत कोरोना निर्बंध आणखी कठोर करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. त्यामुळे आज तज्ज्ञांशी चर्चा करुन मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना निर्बंध कठोर करण्यावर शिक्कामोर्तब करतील, अशी शक्यता आहे.