Omicron Cases In India: ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे राज्य सरकारांना हे महत्वाचे निर्देश

0

नवी दिल्ली,दि.२: Omicron Cases In India: ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Variant) देशात धोका वाढत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटची रुग्ण संख्या दिवेंदिवस वाढत आहे. देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Cases In India) धोका वाढत असतानाच कोरोना रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ दिसू लागल्याने केंद्र सरकार अधिक सतर्क झालं असून आज केंद्रीय आरोग्य विभागाने पुन्हा एकदा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तातडीचे पत्र लिहून काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ दिसत आहे. ६ हजारांच्या खाली आलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येने आता २२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ओमिक्रॉनने डेल्टा व्हेरिएंटची जागा घेतल्यास येत्या काही दिवसांत रुग्णसंख्येचा उद्रेक होण्याची भीती आहे. त्याचे संकेत मुंबई, दिल्ली येथील रुग्णसंख्येवरून मिळत आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने नव्याने दिशानिर्देश जारी केले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union Health Secretary Rajesh Bhushan) यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले असून त्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी व रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी सूचना केल्या आहेत.

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत फिल्ड हॉस्पिटल्सची उभारणी करण्यात यावी, असे निर्देश देतानाच होम हायसोलेशनमधील रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष टीम तयार करण्यात याव्या, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. रॅपिड अँटिजेन टेस्ट वाढवण्यात याव्यात, जिल्हा स्तरावर औषधे आणि ऑक्सीजनची पुरेशी उपलब्धता असेल याची खातरजमा करावी. येणाऱ्या कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी आरोग्य व्यवस्था सक्षम असेल यासाठी पावले उचलावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

देशात सध्या दररोज २० लाख इतक्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याची क्षमता आहे. ती क्षमता वाढवण्यात यावी, असेही केंद्राने राज्यांना सांगितले आहे. रुग्णसंख्या वाढल्यास टेस्ट वाढवाव्या लागणार आहेत. अशावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये तसेच सर्व दवाखान्यांनाही टेस्ट करण्यास परवानगी दिली जावी. अगदी वाडी वस्तीतही रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी तात्पुरते कॅम्प लावण्यात यावेत, असे केंद्राने सांगितले आहे. करोना चाचणी घरीच करण्यासाठी विविध सात किटना मंजुरी देण्यात आलेली आहे. या किट मुबलक प्रमाणात खरेदी करण्याची सूचनाही केंद्राने राज्यांना केली आहे. आवश्यकतेनुसार निर्बंध कडक करण्याचे तसेच कंटेनमेंट झोन तयार करण्याचे निर्देश आधीपासूनच केंद्राने दिलेले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here