ठाणे,दि.१४ः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गु्हा दाखल झाला आहे. ट्विटरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या निखील भामरे या ट्विटर युजर विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद परांजपे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निखील भामरे या व्यक्तिने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला आहे. “वेळ आली आहे बारामतीच्या “गांधी”साठी… बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटनुसार शरद पवार यांना मारण्याचा आणि समाजात अशांतता निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार धमकी तसेच चिथावणी दिल्याप्रकरणी हा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शुक्रवारी भामरे याचे ट्विट राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रिट्विट करत विकृत माणसावर कठोर कारवाई करा असे म्हटले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली.