मुंबई,दि.२५: राज्य सरकार चौथे महिला धोरण राबवत असून आता मुलाच्या किंवा मुलीच्या नावापुढे आईचे नाव लिहावे लागणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. बारामती येथे ग्रामपंचायत सरपंचांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. आतापर्यंत आपण मुलांच्या नावापुढे वडिलांचे नाव लागलेले पाहत आलो आहोत. गेल्या काही वर्षांपासून काही लोक उस्फुर्तपणे आपल्या नावापुढे आईचे नाव लावताना दिसतात.
”महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण आणले आहे, ज्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. फार बारकाईने हे धोरण आणले गेले आहे. याआधी मुल जन्माला आल्यानंतर त्याच्या नावापुढे वडिलांचे नाव लावले जायचे. मुलाचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जायचे. आता आपण नवीन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलाचे किंवा मुलीचे नाव, मग आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जाईल.”, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.
अजित पवार काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण आणले आहे, ज्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. फार बारकाईने हे धोरण आणले गेले आहे. याआधी मुल जन्माला आल्यानंतर त्याच्या नावापुढे वडिलांचे नाव लावले जायचे. मुलाचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जायचे. आता आपण नवीन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलाचे किंवा मुलीचे नाव, मग आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जाईल.”
महिलादेखील समाजातील महत्त्वाचा घटक आहे, असे सांगताना अजित पवार म्हणाले की, मी अर्थमंत्री असताना विविध निर्णय घेतले. एखाद्या पुरुषाने सदनिका विकत घेतली तर त्यावर सहा टक्के कर लावला जातो, जर महिलेच्या नावावर सदनिका घेतली तर केवळ पाच टक्के कर लावला जातो. त्यामुळे इथून पुढे पती घर घ्यायचा विचार करत असेल तर पत्नीने पैसे वाचविण्यासाठी हा पर्याय पतीपुढे ठेवायला हरकत नाही, असेही अजित पवार मिश्किलपणे म्हणाले. महिला धोरणाच्या बाबतीत टप्प्याटप्प्याने माहिती देऊ, असे त्यांनी जाहीर केले.