उद्धव ठाकरेंना अजूनही मानतो वगैरे हे ढोंग का करताय: निलेश राणे

0

दि.14: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. भाजपाच्या पाठिंब्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून दीपक केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली. एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदार उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत असेच सांगतात. तसेच, उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या काही नेतेमंडळींवर देखील टीका केली होती.

मात्र, आता राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंवर केलेली टीका सहन करणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत या आमदारांनी ठणकावून सांगितलं आहे. विशेषत: राणे कुटुंबीय आणि किरीट सोमय्या यांच्या दिशेने हा रोख असल्याचं सांगितलं जात आहे. या मुद्द्यावरून कोकणातील बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि राणे कुटुंबीय यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे.

“उद्धव ठाकरे हे आजही आमचे आदरणीय असून आम्हाला आजही त्यांनी बोलवावे, आम्ही जायला तयार आहोत. उद्धव ठाकरे यांच्याविषयी कुणी काहीही बोलले तर ते आम्हाला चालणार नाही़ भाजपच्या नेत्यांना आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाही आम्ही सांगितले आहे की, उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणी काहीही बोलले तर ते खपवून घेतले जणार नाही”, असं काही दिवसांपूर्वी केसरकरांनी म्हटलं होतं. राणे कुटुंबीयांकडून केल्या जाणाऱ्या टीकेवर त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली होती.

भाजपा नेते निलेश राणे यांनी टीव्ही 9 शी बोलताना दीपक केसरकरांच्या भूमिकेवर टीका केली आहे. “आपण आज एका युतीमध्ये आहोत. जेवढी गरज आम्हाला तुमची आहे, तेवढीच तुम्हाला आमची आहे. दीपक केसरकरांची मतदारसंघात काय अवस्था आहे हे मला चांगलं माहिती आहे. एकही नगरपालिका, नगरपंचायच, जिल्हा परिषद, पवंचायत समिती, ग्रामपचायत त्यांच्याकडे नाही. सगळ्या भाजपाकडे आहेत. शिंदेंमुळे केसरकरांना राजकीय कुबड्या मिळाल्या आहेत. ते शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे भाजपाच्या लोकांविषयी बोलण्याचe अधिकार त्यांना नाही. हल्ली आम्ही त्यांची दखलही घेत नाहीत. ते नव्यानेच माध्यमांसमोर बोलायला शिकलेत. पण कधीतरी भरकटतात ते”, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

“हा माणूस उद्या काहीही बोलेल आणि आम्ही ते ऐकून घेणार एवढे काही दीपक केसरकर मोठे नाहीत. ते म्हणतात नारायण राणेंनी बोलण्याची शैली बदलावी. हे केसरकर आम्हाला बोलणार? ज्यांच्या मतदारसंघात २५ माणसंही त्यांना विचारत नाहीत, त्यांना आम्ही का विचारणार?” असं निलेश राणे म्हणाले आहेत.

“आता ते स्वत:ला विश्वप्रवक्ते समजायला लागले आहेत. उद्या तुम्ही त्यांना ब्रिटनच्या बोरीस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्याबद्दल विचारलं, तर त्यावरही ते बोलतील. त्यांनी असं करायला नको होते, मी त्यांना समजावलं होतं वगैरे सांगतील. ते त्या भूमिकेत गेलेत. त्यामुळे ते काहीही बोलायला लागले आहेत”, अशा शब्दांत निलेश राणेंनी टोला लगावला आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंविषयी केसरकरांनी केलेल्या विधानावरून देखील टीका केली. “म्हणे उद्धव ठाकरेंवर कुणी बोलायचं नाही. अडीच वर्ष जेव्हा आम्ही ठाकरेंवर टीका केली, तेव्हा केसरकर कुठे होते? आज त्यांना अचानक साक्षात्कार झालाय की उद्धव ठाकरे चांगले आहेत. उद्धव ठाकरे बनावट हिंदुत्व दाखवत होते म्हणून तुम्ही इकडे आलात ना? हिंदुत्वासाठी आलात. उद्धव ठाकरे पटत नव्हते म्हणून तुम्ही इकडे आलात. मग उद्धव ठाकरेंना अजूनही मानतो वगैरे हे ढोंग का करताय? त्यांना मानत होतात, तर मग सोडून का आलात?” असा सवाल निलेश राणेंनी केला आहे.

“कोकणातून जो माणूस संपला होता, त्यांचं राजकारण आज पुन्हा काही कारणाने जिवंत झालं आहे. त्यांनी जास्त हवेत उडू नये. तुमची जमिनीवरची काय कुवत आहे, हे आम्हाला माहिती आहे. राणेंच्या याच दोन मुलांनी तुमचं राजकारण संपवत आणलं होतं. आता फक्त 2024 ची वाट बघत होतो की तुम्हाला कायमचं कोकणात पाठवायचं. दीपक केसरकर कधी आमदार होते का? हेही लोक विसरले असते. योगायोगाने तुम्ही आमच्याकडे आले आहात. चांगले राहा. नको त्या विषयात नाक टाकू नका. अनेक नाकं आम्ही राणेंनी छाटलेली आहेत”, अशा शब्दांत निलेश राणेंनी इशारा दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here