Omicron: कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन रुग्णसंख्येत दक्षिण आफ्रिकेत प्रचंड वाढ

0

दि.30: कोरोना व्हायरसच्या नवीन ओमिक्रॉन (Omicron) प्रकाराने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. WHO सतत या नवीन प्रकाराबाबत सावध राहण्याचा सल्ला देत आहे. कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमीक्रॉन (Omicron) जगासाठी एक नवीन समस्या बनत आहे. नवा व्हेरिएंट हा वेगाने पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ज्या प्रांतात ओमायक्रॉन व्हेरिएंट सर्वप्रथम आढळून आला होता, त्या भागातील रुग्णालयांत रुग्णसंख्येत तब्बल 330 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आता समोर आली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या गाँटेग प्रांतात पहिल्यांदा ओमायक्रॉन आढळून आला होता. त्यानंतर हा प्रांत दक्षिण आफ्रिकेतील नवा ‘वुहान’ ठरला होता. गाँटेक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात नव्यानं दाखल होणारी कोरोना रुग्णाची संख्या 580 वर पोहचली आहे. दोन आठवड्यांच्या रुग्णसंख्येवर नजर टाकली असता ही तब्बल 330 टक्के वाढ असल्याचं दिसून येत आहे. तसेच गाँटेग प्रांतातच दक्षिण आफ्रिकेची राजधानी जोहान्सबर्गचाही समावेश होतो. या प्रांतातील केवळ 40 टक्के नागरिकांनाच कोरोना लसीचा कमीत कमी एक डोस देण्यात आला आहे.

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा आतापर्यंत समोर आलेल्या व्हेरिएंटपैंकी सर्वाधिक संक्रमक असू शकतो तसंच मोठ्या प्रमाणातील म्युटेशन्समुळे लसीलाही मात देऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली होती. याच दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या तज्ज्ञांनी ओमायक्रॉन स्वरुपातील विषाणू संक्रमणामुळे रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं सांगितलं. यातील अनेक रुग्णांत हलकी लक्षणं आढळून आली आहेत. गाँटेग प्रांतातील आरोग्य तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. उनबेन पिल्लै यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 10 दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली. देशातील नव्या प्रकरणांपैंकी तब्बल 81 टक्के प्रकरणं केवळ गाँटेग प्रांतामध्ये आढळली आहेत.

कोरोना रुग्णांमध्ये हलकी लक्षणं दिसून येत आहेत. या रुग्णांना हलका ताप, कोरडा खोकला, रात्री अधिक घाम सुटणं, शरीरात वेदना जाणवणं अशा प्रकारची लक्षणं दिसून येत आहेत. यातील अनेक रुग्णांवर घरीच उपचार सुरू करण्यात आले आहेत. डॉ. उनबेन यांच्या म्हणण्यानुसार, लस घेणाऱ्या लोकांची स्थिती लस न घेणाऱ्या लोकांहून चांगली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांत सर्वाधिक तरुण रुग्णांचा समावेश आहे. या तरुणांमध्ये हलकी लक्षणं आढळून आल्यानं त्यांना जीवाचा धोका कमी असल्याचंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here