शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर राष्ट्रवादीचा भाजपाला सूचक इशारा

0

मुंबई,दि.९: शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर राष्ट्रवादीने भाजपाला सूचक इशारा दिला आहे. शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे आमचीच खरी शिवसेना असा दावा केला होता. त्यावरून आयोगाने दोन्ही गटाकडून आवश्यक कागदपत्रे मागवली. त्यानंतर हा वाद सुप्रीम कोर्टात गेला. परंतु कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर कागदपत्रांच्या आधारे आयोगाने तात्पुरतं दोन्ही गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही असं स्पष्ट केले आहे. 

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेतील या वादामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे. क्रास्टो यांनी ट्विट करत म्हटलंय की, भाजपाचे ‘ऑपरेशन लोटस’ नव्हे, हे तर ‘ऑपरेशन डिवाइड अँड रूल’ होते. इंग्रजांची पॉलिसी वापरून एक हौशी मोहरा वापरला आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी यांची शिवसेना व धनुष्य बाण गोठवले. पण भाजपने हे लक्षात ठेवावे, त्यांनी खेळलेला हा डाव कधी त्यांच्यावर देखील उलटला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. 

आयोगाची ऑर्डर नेमके काय सांगते?

चिन्हाबाबत : धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठविले असल्याने शिवसेनेच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिलेल्या निवडणूक चिन्हांच्या पर्यायापैकी त्यांना हवे ते वेगवेगळे चिन्ह मिळेल. त्यासाठी : शिवसेनेतील ठाकरे व शिंदे गटाने चिन्हांचेही तीन पर्याय पसंतीक्रमानुसार आयोगाला सोमवारी दुपारपर्यंत द्यायचे आहेत. त्याचा निर्णयही सोमवारी आयोग घेईल.

नावाबाबत : शिवसेनेतील दोन गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने एक दिलासा दिला आहे. दोन्ही गटांची जर इच्छा असेल तर शिवसेना हे नाव वापरून त्यापुढे स्वत:च्या गटाचे नाव जोडून ते वापरण्यास आयोगाने हरकत घेतलेली नाही. त्यासाठी : शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आपल्याला कोणत्या नावाने ओळखले जावे याचे तीन पर्याय पसंतीक्रमानुसार निवडणूक आयोगासमोर सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत सादर करावे लागती, असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यावर निवडणूक आयोग निर्णय देणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here