मुंबई,दि.१६: NCP On Politics: विजय वडेट्टीवार यांच्या खळबळजनक दाव्यानंतर राष्ट्रवादीने स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाने भाजपासोबत सत्तेत सहभागी होत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून ते आता मुख्यमंत्री होणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजारपणाच्या कारणामागेही हीच चर्चा झडत होती. तर, नुकतेच विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झालेले विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत विधान केले होते. त्यावर, अजित पवारांनी पुण्यातील कार्यक्रमातून स्पष्टीकरणही दिले. मात्र, आता पुन्हा एकदा विजय वडेट्टीवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. तसेच, अजित पवार मुख्यमंत्री न होण्यामागचे राजकारणही त्यांनी सांगितलं. त्यावर, आता अजित पवार गटाकडून खा. सुनिल तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. (NCP On Politics)
विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा
शरद पवार सोबत आले नाहीत तर तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, अशी अट मोदींनी अजित पवारांना घातली आहे, असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शरद पवार आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल अन्यथा तुम्हाला सीएम पदाचे स्वप्न पूर्ण होणार नाही. म्हणूनच पवारांना सोबत चला असा त्यांचा आग्रह असू शकेल. त्यातून त्यांची भेट घेऊन दया याचना करत असतील असे म्हणालायला हरकत नाही, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. वडेट्टीवारांच्या विधानावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी भूमिका मांडली. तसेच, या विधानात कुसलेही तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण | NCP On Politics
अजित पवार आणि मुख्यमंत्रीपदाबाबत गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील, काँग्रेस नेते असतील किंवा शिवसेना ठाकरे गटाचे काहीजण असतील, यांची विधाने ही संकुचित प्रवृत्तीची लक्षणं आहे, भाजपासोबत जाताना अशी कुठलीही अट ना आम्ही ठेवली, किंवा भाजपाकडून तसा कुठलाही प्रस्ताव आमच्यासमोर ठेवण्यात आला नाही. केवळ, महाराष्ट्राच्या गतीमान विकासासाठी आणि देशाला कणखर नेतृत्व मिळावे, यासाठी आम्ही सत्तेत सहभागी झाल्याचं सुनिल तटकरे यांनी सांगितले. आमच्या निर्णयामुळे काहींना मोठं दु:ख झालंय. त्यामुळे, ते अशी विधानं करत आहेत, असेही तटकरे यांनी म्हटले.
वडेट्टीवार यांना मोदींच्या मनात काय सुरु आहे हे समजत असेल तर मग काँग्रेसने विरोधी पक्षनेता का केले असा प्रश्न पडेल. मोदींच्या एवढा जवळचा नेता विरोधी पक्षनेतेपदी आला आहे. मोदींनी अशी अट घातली असती तर अजित पवार उपमुख्यमंत्री पदी कसे बसले असते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसह राजकीय परिस्थिती पाहता मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी अजित पवारांसारखे नेतृत्व असलेला नेता सोबत असण्याची आवश्यकता आहे. अजित पवारांमुळे राज्याच्या विकासात गती येऊ शकते, या विचारातून सरकारच्या प्रक्रियेत सहभागी करण्यात आले आहे, असे अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले.