राष्ट्रवादीने राज ठाकरेंना डिवचलं, नवीन भोंगा कोणता लावायचा यावर विचाविनिमय सुरू आहे

0

मुंबई,दि.२०: अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौऱ्याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी ट्वीटमध्ये केले आहे. प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती.

राज ठाकरेंच्या निर्णयावर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं टीका करत राज ठाकरे यांना डिवचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्विट करण्यात आलं असून यात राज ठाकरेंनी जे पोस्टर ट्विट करत अयोध्या दौरा तूर्तास रद्द करत असल्याचं म्हटलं होतं. तेच पोस्टर राष्ट्रवादीनं ट्विट केलंय पण त्यासाठी लिहिलेलं कॅप्शन आता चर्चेचा विषय ठरत आहे. 

“तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरुन लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच”, असं ट्विट राष्ट्रवादीनं केलं आहे. ट्विटमध्ये राष्ट्रवादीनं मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलला देखील मेन्शन केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ट्विटवर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित करत असल्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेवर निशाणा साधला आहे. भाजपाने राज ठाकरेंसोबत असं का केलं? असं म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला. कुणाचा अयोध्या दौरा का रद्द झाला याबाबत आम्हाला काही माहित नाही. पण तुमचा वापर केला जातोय हे आतातरी लक्षात घ्यावं, असंही राऊत म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here