मुंबई-गोवा क्रुझवर NCB चा छापा, शाहरुख खानच्या मुलाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू

0

दि.3 : मुंबईच्या समुद्रात गोव्याला निघालेल्या एका मोठ्या क्रूझवर मुंबईच्या अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मोठी कारवाई करत ड्रग पार्टी करणाऱ्यांना अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 8 जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त असून ताब्यात घेतलेल्यांमध्ये अभिनेता शाहरुख खानच्या मुलाचाही समावेश आहे. एनसीबीने मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर सुरू असलेल्या हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (Narcotics Control Bureau) पहिल्यांदाच समुद्रात अशाप्रकारची छापेमारी करत ऑपरेशन केलं आहे.या कारवाईनंतर NCB नं अधिकृत माहिती दिली आहे.

एनसीबीनं दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, NCB मुंबईच्या अधिकाऱ्यांनी 02.10.2021 रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रूझवर छापा टाकला. या ऑपरेशन दरम्यान MDMA/ एक्स्टसी, कोकेन, एमडी (Mephedrone) आणि चरस सारख्या विविध ड्रग्स जप्त करण्यात आले. यात एकूण 8 जणांना ताब्यात घेतलं असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. सध्या ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी एनसीबी मुंबईनं गुन्हा 94/21 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची चौकशी

या कारवाईत बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shah Rukh Khan’s son Aryan Khan) मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. एनसीबीनं आर्यन खानलाही ताब्यात घेतलं असून त्याची सध्या चौकशी सुरु आहे. मात्र आपल्याला गेस्ट म्हणून बोलावलं असल्याचं आर्यन खाननं सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

NCB सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात क्रुझवरुन ताब्यात घेतलेल्या आर्यन खानचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आर्यन खाननं चौकशीत सांगितलं की, त्याला या क्रुझवर गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं आणि त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं मानधन देण्यात आलेलं नव्हतं. केवळ आपल्या नावाचा वापर करुन इतरांना बोलावण्यात आलं होतं.

NCB ला तीन दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती मिळाली होती. कोड वर्ड वापरुन ही पार्टी आयोजित केली होती. RTPCR असा हा कोड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

एक आयपीएस अधिकारी ही ताब्यात

याशिवाय एका आयपीएस अधिकाऱ्यालाही (IPS Officer) ताब्यात घेतलं गेलं आहे. या सर्वांकडे अंमली पदार्थ सापडले. यात ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती हा ॲडिशनल सीपी दर्जाचा अधिकारी आहे. पार्टीत सहभागी झालेल्यांनी पँटच्या शिलाईत, महिलांच्या पर्समधील हँडलमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईत तसंच कॉलरच्या शिलाईत अंमली पदार्थ आणले होते. अंमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनीच या पार्टीबद्दल माहिती दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here