Nawab Malik: नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंवर पुन्हा गंभीर आरोप

0

मुंबई,दि.२: Nawab Malik On Sameer Wankhede: राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) यांनी एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरुद्ध आरोपांची मालिका सुरू केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज, रविवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. काही जुन्या प्रकरणांत पंचांवर कशा प्रकारे दबाव टाकला जातो, याबाबतच्या दोन ऑडिओ क्लिप त्यांनी ऐकवून वानखेडे आणि एनसीबीवर आरोप केले. पंचनाम्यात दुरुस्ती करण्यासाठी फोन करून दबाव टाकण्यात येत असल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतंय. यावेळी वानखेडे यांना कार्यकाळ वाढवून देण्यात यावा यासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या काही नेत्यांनी दिल्लीत प्रयत्न सुरू केल्याचा दावाही त्यांनी केला.

नबाव मलिक यांनी एनसीबीचा ‘फर्जिवाडा’ उघड करणार असल्याचा इशारा दिला होता. नववर्षानिमित्त एनसीबीच्या बोगस कारवायांचा भंडाफोड करणार असल्याचा संकल्प त्यांनी ट्विटद्वारे केला होता. त्यानंतर नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबी आणि एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. मागील काही प्रकरणांत पंचांवर दबाव टाकून स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत, असा आरोप करतानाच, दोन ऑडिओ क्लिप ऐकवल्या.

काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?

नवाब मलिक यांनी यावेळी दोन ऑडिओ क्लिप ऐकवून एनसीबी आणि समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले. एनसीबीकडून कशा प्रकारे बोगस कारवाया केल्या जातात हे त्यांनी सांगितले. या ऑडिओ क्लिपमध्ये मॅडी नावाचा पंच आहे आणि त्याला किरण बाबू नावाच्या अधिकाऱ्याने फोन केला. एका जुन्या प्रकरणात पंचनाम्यावर सही कर आणि आमच्या समक्ष पंचनामा केला आहे, कारवाईची प्रक्रिया केली आहे, असे त्यात आहे, असे तो अधिकारी सांगत आहे. त्यावर मॅडी नावाची व्यक्ती घाबरून जाते. त्यानंतर मलिक यांनी दुसरीही ऑडिओ क्लिप ऐकवली. यानंतर त्यांनी समीर वानखेडे आणि पंचामध्ये बोलणे झाल्याचा दावा करत गंभीर आरोप केला आहे.

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवरही आरोप

मी काही प्रकरणांत दिलेल्या माहितीचं काय झालं? असा सवाल करतानाच स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालाचं काय झालं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मी ‘फर्जीवाडा’ उघड करत आहे. मला बोलण्यापासून रोखण्याचा विविध माध्यमांतून प्रयत्न केला गेला. पण मी त्याबाबत कोर्टातच बोलणार आहे. त्याबाबत बाहेर कुठेही बोलणार नाही. पण एनसीबी आणि केंद्रीय तपास यंत्रणा काही चुकीचं करत असतील तर, मला प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे, असे मलिक म्हणाले. समीर वानखेडेंवर आता एनसीबी काय कारवाई करणार, असा सवालही त्यांनी केला. समीर खानचा जामीन रद्द करण्यासाठी हायकोर्टात अपील केल्याचे मला कळले आहे. या प्रकरणात इतरही आरोपी आहेत, पण फक्त समीर खानच्या जामीनाविरोधातच अपील करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. समीर वानखेडेंच्या सेवेतील मुदतवाढीसंदर्भातही मलिक यांनी भाष्य केले. वानखेडे यांना मुदतवाढ दिली जावी, यासाठी महाराष्ट्रातील काही भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत लॉबिंग सुरू केली आहे, असा दावाही मलिक यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here