नवी मुंबई,दि.५: राज्यात एका बाजूला भोंदू अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच, नवी मुंबईतही एका भोंदूबाबाने धर्माच्या आणि श्रद्धेच्या नावाखाली महिलांच्या आयुष्याशी खेळ केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अब्दुल रशीद उर्फ बाबाजानअसे या भोंदूचे नाव असून, काळी जादू उतरवण्याच्या बहाण्याने त्याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.
श्रद्धेचा बाजार आणि दहशतीचा खेळ
हा भोंदूबाबा केवळ गोड बोलून लोकांना आपल्या जाळ्यात ओढत नसे, तर तो एक ‘सायकोलॉजिकल गेम’ खेळायचा. सुरुवातीला अल्लाचे महत्त्व आणि तत्त्वज्ञान सांगून तो लोकांचा विश्वास जिंकायचा. एकदा का भक्त पूर्णपणे शरण आला की, मग सुरू व्हायचा वासनेचा आणि लुटीचा खेळ.
फसवणुकीची धक्कादायक कार्यपद्धती
• समस्यांचे समाधान: घरगुती वाद, आर्थिक चणचण आणि शारीरिक आजार बरे करण्याचा दावा.
• काळ्या जादूची भीती: “तुमच्यावर कुणीतरी करणी केली आहे,” असे सांगून महिलांना मानसिकदृष्ट्या घाबरवणे.
• फार्म हाऊसवर अघोरी प्रकार: पूजा करण्याच्या नावाखाली महिलांना खालापूर येथील एका निर्जन फार्म हाऊसवर बोलावले जायचे. तिथे मध्यरात्री महिलांना विवस्त्र करून ‘अघोरी पूजा’ करण्याची सक्ती हा नराधम करत असे.
माय-लेकीवर अत्याचार आणि हत्येचा प्रयत्न
बाबाजानची क्रूरता केवळ एका महिलेपुरती मर्यादित नव्हती. त्याने सांताक्रुझ येथे एकाच कुटुंबातील आई आणि मुलीवर बलात्कार केल्याचा गंभीर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या कृत्याला विरोध करणाऱ्या पीडितांना त्याने जीवे मारण्याचाही प्रयत्न केला होता.
कळंबोलीत संताप; आरोपी फरार
कळंबोली येथील ज्या घरातून हा काळा धंदा सुरू होता, तिथे भक्तांची वाढती गर्दी पाहून सोसायटी सदस्यांनी त्याला घर सोडण्यास बजावले होते. दरम्यान, दोन पीडित महिलांनी धाडसाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांची चाहूल लागताच बाबाजान आपल्या कुटुंबासह फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
“भोंदूगिरी ही समाजाला लागलेली कीड आहे. पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी यासाठी आम्ही त्यांना पाठबळ दिले आहे. अशा नराधमांना कोणत्याही राजकीय पक्षाने पाठिशी घालू नये.”— मुस्लिम सत्यशोधक मंडळ








