आगे आगे देखो होता है क्या नारायण राणे यांनी ट्विट करून दिला इशारा

0

मुंबई,दि.२३: केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना इशारा दिला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर मंगळवारी (दि.२२) ईडीने कारवाई केली. आजपर्यंत राष्ट्रवादीचे मंत्री ईडीच्या रडारवर होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि सध्या बिनखात्याचे मंत्री असलेले नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर ईडीने धडक कारवाई केली. पण आता ईडीने थेट ठाकरे कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांवर कारवाईचं हत्यार उपसलं आहे.

श्रीधर पाटणकरांच्या ठाणे येथील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. जवळपास साडे सहा कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. ईडीच्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालीय. अशातच ठाकरेंचे कट्टर विरोधक केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पाटणकरांवरील कारवाईच्या अनुषंगाने ट्विट करत ठाकरेंना डिवचलं आहे तर ‘आगे आगे देखो होता है क्या’ म्हणत मुख्यमंत्र्यांना थेट इशाराही दिला.

ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई केली. पाटणकर यांचे जवळपास साडे सहा कोटींचे ११ फ्लॅट्स ईडीने जप्त केले आहेत. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या पाठीमागे ईडी लागली होती. पण आता ईडीचं टार्गेट ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय आहेत. महाविकास आघाडी तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईने त्रस्त झाली आहे. आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्याचं वृत्त आलं आणि महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळ हादरलं.

पाटणकर यांच्यावरील कारवाईनंतर ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेले राणे कसे काय शांत, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण कारवाईनंतर ५ तासांनी नारायण राणे यांनी डाव साधलाच. मेव्हण्यावरील कारवाईने अगोदरच ठाकरे टेन्शनमध्ये आहेत. त्यात नारायण राणेंनी आणखी भर टाकली आहे. राणेंनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळणारे २ ट्विट केले आहेत. त्यातून त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट इशारा दिलाय.

महाराष्‍ट्रात भ्रष्‍टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्‍हणतात चोराच्‍या उलट्या बोंबा. सव्वा दोन वर्षांत महाराष्‍ट्राच्‍या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्‍यांच्‍या नशिबी आत्‍महत्‍या! पण आता आगे आगे देखिए होता है क्‍या……!

आप्‍तांच्‍या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्‍ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्‍या वाट्याला यातील काहीही नाही. सत्‍ता फक्‍त आपण आणि आपल्‍या नातेवाईकांसाठीच!, अशा शब्दात नारायण राणेंनी सेनेवर तोंडसुख घेतलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here