नायब तहसीलदारास मारहाण प्रकरण आठ जणांची निर्दोष मुक्तता

0

सोलापूर,दि.16: तत्कालीन नायब तहसीलदार सुरेश भीमराव गायकवाड रा. सेटलमेंट, सोलापूर यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विजयपूर, राज्य कर्नाटक येथील 1) दिलीप रुपसेन मरगूर 2) दिलीप धोंडप्पा अतनुरे 3) अनिल दिलीत मरगुर 4) मनोज परमेश्वर मरगुर 5) चंद्राम विठोबा अतनुरे 6) परमेश्वर बसवराज धुळे 7) शरणबसप्पा चंद्राम अतनुरे 8) अनिल चंद्राम धुळे यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आय.एन.शेख यांच्यासमोर होऊन त्यांनी गुन्हा शाबित न झाल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी की दि. 4/7/2014 रोजी मौजे कुडल, ता. अक्कलकोट येथे तीन मुली या भीमा नदीच्या पात्रातून पाणी आणण्यास गेले असता, त्या तिन्ही मुली नदीपात्रातील डोहात बुडून मयत झाल्या होत्या, त्यावेळी नायब तहसीलदार, तलाठी, कोतवाल असे जिप घेऊन घटनास्थळी आले होते. त्यावेळेस लोकांची गर्दी जमलेली होती.

त्यावेळी लोकांनी सरकारी मदत लगेच द्या असे म्हणून आरडा-ओरडा करून नायब तहसीलदार यांना धक्काबुक्की करून त्यांची गाडी पलटी करून गाडी पेटवून दिली, तसेच तेथे असलेल्या पोकलेन वर दगडफेक केली, अशा आशयाची फिर्याद नायब तहसीलदार सुरेश भीमराव गायकवाड यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात दिली होती.

त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्रक दाखल केले होते. सदर खटल्यात सरकारतर्फे नेत्र साक्षीदारासह 7 साक्षीदार तपासण्यात आले होते.

खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपींचे वकील ॲड.मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात घटनास्थळावरून कोणतीही वस्तू जप्त झाल्याचा पुरावा तसेच मयत तीन मुलींचे मरणोत्तर पंचनामा अथवा शवविच्छेदनाचा कोणताही पुरावा सरकार पक्षाने न्यायालयासमोर आणला नसल्याने घटनेबाबत

साशंकता निर्माण होत असल्याने आरोपींनी घटना केली असे म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे ॲड.मिलिंद थोबडे, ॲड. दत्ता गुंड, ॲड. निशांत लोंढे, ॲड. संतोष आवळे, ॲड.अमित सावळगी यांनी तर सरकारतर्फे ॲड. गंगाधर रामपुरे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here