Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशा प्रकारच्या विधानाची अपेक्षा नाही: संजय राऊत

0

सातारा,दि.18: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “जे लोक देवी-देवतांना शिव्या देतात, जे संतांना शिव्या देतात, जे वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, ज्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, तो कोणत्या वर्षी झाला, हे माहिती नाही, अशा मंडळींचा नॅनो मोर्चा होता” अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चाची खिल्ली उडवली होती. फडणवीस यांच्या टीकेला आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

Sanjay Raut | काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी “देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशा प्रकारच्या विधानाची अपेक्षा नाही. हेच वक्तव्य शिवसेनेतून फुटलेल्या 40 आमदार आणि त्यांच्या नेत्याने केलं असतं तर समजू शकलो असतो. कारण त्यांची बुद्धी नॅनो आहे, हे आम्हाला माहिती आहे. मात्र, फडणवीस हे प्रगल्भ राजकारणी आहेत. त्यांनी विरोधी पक्षातही प्रदीर्घ काम केलं आहे, अशा देवेंद्र फडणवीसांना कालचा मोर्चा दिसला नसेल, तर दिल्लीश्वरांनी त्यांना गुंगीचं इंजेक्शन दिलेलं दिसतं आहे, ही त्यांची गुंगी अद्यापही उतरलेली नाही” असं म्हटलं आहे.

Sanjay Raut Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीसांनी यांनी मोर्चाला सामोरे जायला हवे होते

“फडणवीस यांनी कालच्या मोर्च्याचे स्वागत करायला हवे होते. तसेच त्यांनी या मोर्चाला सामोरे जायला हवे होते. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. कालचा मोर्चा हा सरकारविरोधी नव्हता, हा मोर्चा हा महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात होता. त्यांच्या विरोधात महाराष्ट्राची जनता काल एवटली होती. मात्र, तुम्ही ज्या भाषेत त्यांच्या विरोधात बोलत आहात, हे राज्यकर्ता असल्याचे लक्षण नाही” असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.

काय म्हणाले होते फडणवीस?

उद्धव ठाकरे यांचा पक्ष जसा नॅनो होतो आहे, तसा हा नॅनो मोर्चा होता, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणत्या तोंडाने हे मोर्चा काढत आहेत. महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान कुणीच करू नये आणि कुणी करीत असेल तर ते योग्य नाही, अशीच स्पष्ट भूमिका आम्ही वारंवार घेतली आहे. त्यामुळे केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतो आहे. मुद्दे संपले की अशा कारणांवर मोर्चे काढले जातात,” असा घणाघात फडवीसांनी केला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here