सोलापूर,दि.४: खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ एक गॅस टँकर उलटल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक १६ तासांहून अधिक काळ ठप्प झाली. गळणाऱ्या टँकरमुळे मुंबईकडे जाणारे रस्ते पूर्णपणे बंद झाले, ज्यामुळे हजारो वाहनचालक अडकले. अनेक प्रवाशांची विमान उड्डाणे चुकली. अधिकाऱ्यांनी पर्यायी मार्ग सुचवले आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.
पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेवरील वाहतूक गेल्या १५-१६ तासांपासून ठप्प आहे. आडोशी बोगद्याजवळ एक टँकर उलटला आहे, ज्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. टँकरमधून प्रोफिलिन गॅस सतत गळत आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव, मुंबईकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. एक्सप्रेस वेवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत, ज्यामुळे हजारो चालक अडकले आहेत. काही पहाटे ४ वाजल्यापासून तर काही पहाटे ३-५ वाजल्यापासून तिथे अडकले आहेत. वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांना त्यांच्या विमानांचे उड्डाण चुकवावे लागले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एरिअल व्ह्यू फोटोंमध्ये खंडाळा घाटातील नागमोडी वळणांवर किलोमीटरपर्यंत केवळ वाहनांच्या रांगा दिसत आहेत, जणू हा महामार्ग नसून वाहनांचे एक महाकाय सर्प असल्याचेच भासत आहे. एसी आणि लाईट्स सुरू ठेवल्यामुळे अनेक गाड्यांमधील इंधन संपले असून, आता त्या गाड्या धक्का मारून बाजूला करण्याची वेळ आली आहे.








