मुंबई,दि. २७: नव्या तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल सेवा उपलब्ध करून देणाऱ्या महावितरणला ग्राहकांनी कॅशलेस वीजबिल भरण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला आहे. वीजबिलांच्या रकमेपैकी तब्बल ७२ टक्के रकमेचा भरणा ऑनलाईन झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात तब्बल ५३ हजार ९५० कोटी रुपये वीजबिलाचा सुरक्षित व सोयीनुसार ऑनलाईन भरणा ग्राहकांनी केला आहे. एकूण ग्राहकांच्या तुलनेत ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण ७४ टक्के इतके असून, यामध्ये उच्चदाब ग्राहकांचे प्रमाण ९८ टक्के तर लघुदाब ग्राहकांचे प्रमाण ५८ टक्के इतके आहे.
गेल्या सात आठ वर्षापूर्वी ऑनलाईनद्वारे वीजबिल भरण्याचे प्रमाण नगण्य होते. ऑनलाईन वीजबिल भरण्यास ग्राहकांनी पसंती दिल्याने हे प्रमाण आजमितीस ५४ टक्क्यांपर्यत वाढले. विशेषत: करोना काळात ऑनलाईनद्वारे वीजबिलांचा भरण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. ऑनलाईन वीजबिल भरीत असल्यास त्या ग्राहकाला वीजबिलाच्या ०.२५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५०० रुपये पर्यंत सूट मिळते. ही बाब ग्राहकांपर्यत पोहचविण्यास महावितरण यशस्वी झाले आहे.
महावितरणने सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सर्व सेवा डिजिटल माध्यमांद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये सर्व वीज ग्राहकांसाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल ॲप तसेच उच्चदाब ग्राहकांसाठी स्वतंत्र RTGS सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे प्रामुख्याने दरमहा वीजबिलांचा भरणा ऑनलाईन करण्यासोबतच महावितरणच्या सर्व ग्राहकसेवा देखील लघुदाब व उच्चदाब वर्गवारीतील ग्राहकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध आहेत. लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी १० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या वीजबिलावर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. तर यापेक्षा कमी रकमेच्या बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणची अधिकृत वेबसाईट तसेच मोबाईल ॲपची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे बिल भरणा, चालू व मागील वीजबिल पाहणे, पावती पाहणे, एकाच खात्यातून अनेक वीजजोडण्यांचे बिल भरणे यासह इतर सर्व ग्राहक सेवा उपलब्ध आहेत. वीजबिलावर छापलेला क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन करून ग्राहकांना यूपीआयद्वारे ऑनलाइन पेमेंटची सुविधा आहे. तसेच ग्राहकांना वीजबिल भरण्यासंदर्भात नोंदणीकृत मोबाईल क्रमांकांवर पाठवण्यात येणाऱ्या एसएमएसमध्येही पेमेंटची लिंक देण्यात येत आहे. याबरोबरच भारत बिल पेमेंट सर्व्हिस, ईसीएस/ईबीपीपी/एनएसीएच, सेंट्रलाइझ्ड ग्रूप बिल पेमेंट, महापॉवरपे वॉलेट हे मार्गही ऑनलाईन पेमेंटसाठी उपलब्ध आहेत.
गेल्या आर्थिक वर्षात लघुदाब ग्राहकांनी (एप्रिल २०२१ ते मार्च २०२२) एकूण १९ हजार ३४७ कोटी ५५ लाख रुपयांच्या (४९.४० टक्के) वीजबिलांचा घरबसल्या ऑनलाईन भरणा केला. उच्चदाब वीजग्राहकांसाठी दरमहा वीजबिल आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे भरण्याची सोय उपलब्ध झाल्याने गेल्या वर्षभरात उच्चदाब ग्राहकांनी ३४ हजार ६०२ कोटी ८८ लाख रुपयांचा (९८.०१ टक्के) भरणा ऑनलाईन केला आहे. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव धनादेश बाऊन्स होणे, तो वटण्यास उशिर होणे किंवा अन्य अडचणी येणे आदी पूर्वीचे अडथळे पूर्णतः दूर झाले आहेत.
महावितरणच्या सर्वच परिमंडलातील उच्चदाब व लघुदाब ग्राहकांनी वीजबिल ऑनलाईन भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला आहे. परिमंडलनिहाय एकूण वीजबिलांच्या रकमेपैकी ऑनलाइन भरलेली रक्कम व त्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे : औरंगाबाद परिमंडल – ३९६०.९६ कोटी (८५.७८ टक्के), लातूर- ७१०.२४ कोटी (५१.९६ टक्के), नांदेड- ५४२ कोटी (४८.४८ टक्के), भांडूप – ९९३१.०३ कोटी (७०.१५ टक्के), जळगाव- १४७५.३३ कोटी (६१.३८ टक्के), कल्याण- ६६४०.१७ कोटी (७८.६७ टक्के) कोकण- ७६९.७८ कोटी (६५.१६ टक्के), नाशिक- ४२६२.५७ कोटी (७४.१० टक्के), अकोला- ६३९.३७ कोटी (४७.७२ टक्के), अमरावती- ८३३.७० कोटी (४८.९८ टक्के), चंद्रपूर- ९४३.६६ कोटी (६३.६७ टक्के), गोंदिया- ५४८.६४ कोटी (६०.२२ टक्के), नागपूर- ३८३८.७३ कोटी (६९.५६ टक्के), बारामती- ४८२४.६७ कोटी (७४.८५ टक्के), कोल्हापूर- ३५१८.८४ कोटी (६९.२४ टक्के), पुणे- १०५१०.७३ कोटी (८१.१६ टक्के).
वीजबिल ऑनलाईन भरल्यास लघुदाब वीजग्राहकांना ०.२५ टक्के ( रु.५००/- पर्यंत) सूट प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये देण्यात येत आहे. महावितरणची वेबसाईट व मोबाईल ग्राहकांना वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट सुलभतेने करता यावे व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रेडिट कार्ड वगळता नेट बॅंकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास महावितरणने ग्राहकांना ही सेवा नि:शुल्क केली आहे. लघुदाब ग्राहकांसाठी घरबसल्या एका क्लिकवर वीजबिल भरण्याची सुरक्षित व सोयीची ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. महावितरणच्या या ऑनलाईन पध्दतीने ‘गो ग्रीन’ या संकल्पनेला प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठीची वाटचाल यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. येत्या काळात वीजबिलाची वसुली १०० टक्के ऑनलाईन करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न राहणार असून वीजग्राहकांनी ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.