MS Dhoni Retirement Plan: यंदाची आयपीएल ठरली एकदम खास, १ चेंडू ४ धावा जडेजाने मारला विजयी चौकार

0

मुंबई,दि.३०: MS Dhoni Retirement Plan: यंदाची आयपीएल एकदम खास ठरली आहे. पावसाचे धुमशान आणि त्यात दोन दिवस संपले तरी चाललेला क्रिकेटचा थरार. चेन्नई आणि गुजरात यांच्यातील अंतिम लढत राखीव दिवस संपला तरी निकाली लागली नव्हती. अखेर मॅच संपायला मंगळवार उजाडला, पहाटे अडीज-पावणेतीनलाच रोमांचक मॅच संपली. 

हेही वाचा Earthquake In Solapur District: सोलापूर जिल्ह्यातील या ठिकाणी सौम्य भूकंपाची नोंद

भारताचा माजी कर्णधार, चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार आणि देशातल्या कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला माही अर्थात महेंद्रसिंह धोनी त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात असल्याचं अनेकदा बोललं जात होतं. हा धोनीचा शेवटचा आयपीएल सीजन असेल, असंही काही आजी-माजी खेळाडूंकडून सांगण्यात येत होतं. स्वत: धोनीनंही तशा प्रकारचे सूतोवाच दिले होते. चेन्नई सुपर किंग्जनं यंदाच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करत आपलं पाचवं विजेतेपद पटकावलं. यानंतर प्रतिक्रिया देताना महेंद्रसिंह धोनीनं मोठी घोषणा केली आहे.

पावसाने व्यत्यय आणला तरी प्रेक्षकांना आयपीएलने खिळवून ठेवले. त्यातले त्यात धोनीच्या संघावर प्रेम करणारे चाहते होते. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्याने चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले होते. तिकडे धोनी निर्विकार चेहऱ्याने बसला होता. अखेरच्या चेंडूवर चार धावा हव्या असताना धोनीची त्या चेंडूकडे पाहण्याचीही हिंमत नव्हती. पण जडेजाने विजयी फटका हाणला आणि धोनीने त्य़ाला चक्क उचलून घेतले. 

चेन्नई आणि धोनीसाठी हा पाचवा आयपीएल चषक होता. रविंद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार खेचला आणि चेन्नईच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. तोवर स्टेडिअममध्ये सुरु होती, रडारड आणि देवाचा धावा. गुजरातकडून वेगवान गोलंदाज मोहित शर्माने सुरुवातीचे चार चेंडू जबरदस्त टाकले होते. जवळपास चेन्नईच्या हातून मॅच निघून गेली होती. चाहत्यांच्या चेहऱ्यावर अश्रू वाहू लागले होते. 

सामन्यानंतरच्या बक्षीस वितरणावेळी हर्षा भोगलेनं महेंद्रसिंह धोनीला पहिलाच प्रश्न त्याच्या पुढील वाटचालीबाबत विचारला. “मी तुला प्रश्न विचारू की तू स्वत:च ते सांगणार आहेस?” असं हर्षा भोगलेंनी विचारताच धोनीला प्रश्नाचा अंदाज आला. “नाही, तुम्ही मला प्रश्न विचारा, मग मी त्यावर उत्तर दिलं तर योग्य राहील!” असं उत्तर धोनीनं दिलं.

“मी गेल्या वेळी सीएसकेनं आयपीएल स्पर्धा जिंकली तेव्हा तुला विचारलं होतं की तू सीएसकेसाठी कोणता वारसा मागे सोडून जात आहेस? तेव्हा तू म्हणाला होतास मी अजून कोणताही वारसा मागे सोडलेला नाही”, एवढं बोलून हर्षा भोगले थांबला आणि धोनीनं उत्तर द्यायला सुरुवात केली.

“तर तुम्हाला आता उत्तर हवंय? जर तुम्ही परिस्थितीचा विचार केला तर मी आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. मी या सीजनमध्ये जिथे कुठे सामने खेळायला गेलो, तेव्हा चाहत्यांचं माझ्यावरचं प्रेम पाहाता माझ्यासाठी त्यांना धन्यवाद म्हणणं ही फार सोपी बाब आहे. पण पुढचे ९ महिने मेहनत घेऊन पुढच्या आयपीएल सीजनमध्ये खेळण्यासाठी पुन्हा येणं ही माझ्यासाठी कठीण बाब आहे. पण मली ही गोष्ट माझ्या चाहत्यांसाठी करायची आहे”, असं धोनीनं म्हणताच मैदानावर उपस्थित हजारो प्रेक्षकांनी धोनी-धोनी नावाचा गजर सुरू केला.

“माझ्या शारिरीक स्वास्थ्यावर, फिटनेसवरही हे अवलंबून असेल. हे ठरवण्यासाठी माझ्याकडे ६ ते ७ महिने आहेत. मला वाटतं हे माझ्याकडून माझ्या चाहत्यांसाठी एक प्रकारचं गिफ्ट असेल. हे माझ्यासाठी फार कठीण असणार आहे. पण चाहत्यांनी मला दिलेलं प्रेम पाहाता हे माझं त्यांच्यासाठी गिफ्ट असेल. ही अशी गोष्ट आहे, जी मला माझ्या चाहत्यांसाठी करायची आहे”, असं धोनी म्हणाला.

चेपॉकमध्ये धोनी भावनिक? | MS Dhoni Retirement Plan

दरम्यान, चेपॉकमध्ये तू भावनिक झाला होतास, असं हर्षा भोगलेनं विचारल्यावर धोनीनं त्यावर स्पष्टीकरण दिलं. “हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा आहे. यंदाच्या माझ्या IPL सीजनला इथूनच सुरुवात झाली. मी जेव्हा पॅव्हेलियनमधून खाली उतरलो आणि पाहिलं की सगळं स्टेडियम माझं नाव घेत आहे, तेव्हा माझे डोळे भरून आले. मी डगआऊटमध्ये थोडा वेळ थांबलो. मी माझा वेळ घेतला आणि स्वत:ला सांगितलं की मी हा क्षण एन्जॉय केला पाहिजे. तेच चेन्नईतही घडलं. तो माझा चेन्नईतला शेवटचा सामना होता. पण मला शक्य त्या पद्धतीने तिथे जाऊन पुन्हा खेळणं आता चांगलं ठरेल”, असं म्हणत निवृत्तीबाबत स्पष्टपणे निर्णय जाहीर न करता धोनीनं आयपीएलच्या पुढील सीजनमध्ये पुन्हा खेळण्याचे संकेत दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here