एक नेता, एक संगठन, एक पक्ष खूप मोठे बदल घडवू शकत नाही: मोहन भागवत

0

दि.10: सामान्य जनता रस्त्यावर उतरली तेव्हाच देशाला स्वातंत्र्य मिळाले. यावेळी संघप्रमुख मोहन भागवत म्हणाले की, लोकांनी स्वत:हून जबाबदारी घ्यावी आणि देशाची स्थिती सुधारण्याचा ‘ठेका’ संघ किंवा इतर कोणाला देऊ नये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी मंगळवारी सांगितले की, एकटा नेता देशाच्या समस्यांना सामोरे जाऊ शकत नाही. या देशासमोरील सर्व आव्हानांना एकच नेता तोंड देऊ शकत नाही आणि एकच संघटना किंवा पक्ष बदल घडवून आणू शकत नाही, असे ते म्हणाले.

“संघ लोकप्रिय झाला तर लोक संघाकडे ही सत्ता सोपवायला मागे पुढे पाहणार नाहीत. मात्र, संघ तसे करणार नाही, म्हणजेच संघ कधीही सत्ताकारणात येणार नाही. कोणत्याही संघटनेला दीर्घकाळ कार्यरत राहायचे असल्यास त्या संघटनेतील नेते आणि कार्यकर्ते दोघांनी दक्ष राहून काम करणे गरजेचे असते. “स्टेटस आणि कन्फर्ट” या दोन गोष्टी कोणत्याही संघटनेसाठी आपत्ती ठरते. स्टेटसला प्रेम करणारा नेता आणि कन्फर्ट ला प्रधान्य देणारे कार्यकर्तेच संघटनेचा बट्ट्याबोळ करतात, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. विदर्भ साहित्य संघाच्या शतक महोत्सवी वर्षा निमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत मोहन भागवत बोलत होते.

मोहन भागवत म्हणाले, “देशासमोर असलेल्या आव्हानाचा सामना एकाच नेत्याला करायचा नाही. तो नेता किती ही मोठा असला तरी तो एकटा सर्व आव्हानांचा सामना करू शकत नाही. 1857 पासूनच देशाच्या स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात झाली. त्यावेळी अनेक लोकं उभे राहिले, अनेकांनी बलिदान दिले, अनेकांचे आयुष्य खर्ची गेले. लोकांच्या जीवनाची झालेली बरबादी, लोकांनी केलेले समर्पण हे व्यर्थ गेले नाही आणि त्यामुळे स्वातंत्र्य भेटले. देश सक्षम झाला पाहिजे हेच संघाचे प्रयत्न राहिले आहेत. याच विचारातून 97 वर्षांपूर्वी संघ सुरू झाला होता. एक नेता, एक संगठन, एक पक्ष खूप मोठे बदल घडवू शकत नाही. परंतु, सामान्य माणूस उभा राहतो तेव्हाच मोठे बदल घडतात.

“आधी लोक संघाचा द्वेष करायचे, परंतु, आता तो काळ गेला. संघाला बंदी आणि विरोधाचा देखील सामना करावा लागला, तो काळ ही आता जवळपास पूर्ण झाला आहे. आता तर अनुकुलतेचा काळ आहे. तो ही सुखरूप पार करायचा असून आज जे विरोधक आहेत, त्यांना ही भविष्यात संघाच्या जवळ आणायचे आहे. हे आवश्यक नाही की प्रत्येक व्यक्ती शाखेतच आला पाहिजे. विचार पटले पाहिजेत. 97 वर्ष संघ चालल्यानंतर वाटते की वैचारिक रित्या आम्ही चूक नव्हतो. अनुभवाच्या कसोटीवर संघाचे विचार सिद्ध झाले आहेत, असे मोहन भागवत म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here