Mohan Bhagwat: जातीभेदाचे समर्थन करता येणार नाही: मोहन भागवत

0

नागपूर,दि.८: जातीभेदाचे समर्थन करता येणार नाही, मधल्या काळात मनुष्याने मान खाली घालावी, अशा पद्धतीने आपण आपल्याच लोकांना वागविले असे प्रतिपादन RSS चे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. ‘सामाजिक समता हा आपल्या परंपरेचा भाग होता. सर्व धर्मांच्या आचार्यांनी त्यांच्या शास्त्रांमध्ये विषमतेला, उच्च-नीच्चतेला, अस्पृश्यतेला विरोध असल्याचे जाहीर केले आहे. जातिभेदाचे समर्थन कधीही करता येणार नाही. मधल्या काळात मनुष्याने मान खाली घालावी, अशा पद्धतीने आपण आपल्याच लोकांना वागविले, हेदेखील खरे आहे. या चुका आपण कबूल करायला हव्यात. चुका कबूल केल्याने आपले पूर्वज निकृष्ट ठरत नाहीत,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी केले.

विदर्भ संशोधन मंडळातर्फे ‘वज्रसूची-टंक’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सिव्हिल लाइन्समधील विदर्भ संशोधन मंडळाच्या डॉ. वा. वि. मिराशी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरसंघचालक बोलत होते. मंचावर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना, लेखकद्वय डॉ. मदन कुलकर्णी आणि डॉ. रेणुका बोकारे, मंडळाचे कार्यवाह डॉ. राजेंद्र वाटाणे यांची उपस्थिती होती.

‘आपल्या शास्त्रांना जातीय विषमता मुळीच मान्य नाही. आपल्याकडे गुप्त सम्राटांच्या राजवटीपर्यंत आंतरजातीय विवाह चालायचे. कुणालाचा जातीभेद नको असल्याने ती भावना संविधानातदेखील आली. परंतु, मधल्या काळात आपण केलेल्या चुकांचा, भेदांचा फायदा घेत इंग्रजांनी आपले शास्त्र, पूर्वज चुकीचे आहेत असे सांगितले. त्याला प्रतिकार म्हणून आपणही अस्पृश्यता, वर्णभेद योग्य असल्याचे बोललो. त्यासाठी शास्त्राचे दाखलेसुद्धा देण्यात आले. तरीदेखील अशा प्रकारचे जातीभेदाचे समर्थन मान्य करता येणार नाही. आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकांचे, पापाचे क्षालन करायलाच हवे,’ असे भागवत म्हणाले.

‘चंद्रपूरची भूमी ही केवळ कोळसा देणारी नसून तिने अनेक हिरे दिले आहेत. ती भूमी रत्नगर्भ आहे,’ असे गौरवोद्गार विकास सिरपूरकर यांनी काढले. ‘आपल्या संस्कृतीतील अनेक पुरोगामी विचार योग्य पद्धतीने मांडल्या न गेल्यामुळे त्या अंधश्रद्धा म्हणून गणल्या गेल्याची,’ खंत प्रो. पेन्ना यांनी व्यक्त केली. लेखकद्वय डॉ. मदन कुलकर्णी आणि डॉ. रेणुका बोकारे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मंडळाचे कोषाध्यक्ष प्रणव हळदे यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here