मुंबई,दि.१५: शिवसेना मनसे (Shivsena MNS) विविध मुद्द्यांवरून आमने सामने येत आहेत. शिवसेना मनसेत बॅनर लावून टीका करण्याची पद्धत वाढत आहे. राज ठाकरेंनी नुकत्याच दोन सभा घेतल्या, यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच त्यांच्या सभेतून भाजपा जवळ जाण्याची भूमिका दिसून आली. शिवसेना बदलत्या भूमिकेवरून राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लक्ष्य करत आहे. याच वादातून गुरुवारी शिवसेना भवनासमोर मनसेला डिवचणारा फलक लावण्यात आला होता. काल आज उद्या, अशा मथळ्याखाली लावण्यात आलेल्या या फलकावर राज ठाकरे यांचा मुस्लीम वेषातील फोटो, त्याच्यापुढे हनुमान चालिसा, असे लिहण्यात आले होते. त्यानंतर आता उद्या राज ठाकरे यूटर्न मारून कोणती नवी भूमिका घेणार, असा खोचक प्रश्न या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला होता. या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनसेनेही ‘काल आज उद्या’ या थीमवर बॅनर तयार करत शिवसेनेला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मनसैनिक हा बॅनर शिवसेना भवनासमोर लावण्यासाठी निघाले होते. तेव्हाच पोलिसांनी हा बॅनर ताब्यात घेतला. मनसेला शिवसेना भवनासमोर हा बॅनर लावता आला नसला तरी त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘काल आज उद्या’ या मथळ्याखाली तयार करण्यात आलेल्या या फलकावर एका बाजूला उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो आहे. त्याच्यापुढे सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यासोबतचा फोटो आहे. तर उद्या या रकान्याखाली असलेला भाग मोकळा सोडण्यात आला आहे. अशाप्रकारे मनसेने शिवसेनेला त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि मनसे यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.