मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द, खासदार बृजभूषण सिंह यांच्या त्या दाव्याने शंका उपस्थित

0

मुंबई,दि.२३: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील सभेत अयोध्या दौरा रद्द करण्याचे कारण सांगितले. सापळा रचून दौऱ्याला विरोध करण्यात आल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. आपल्याला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा काहींचा प्रयत्न होता. मनसैनिकांना खोट्या केसेसमध्ये अडकवले जाईल, अशी भीतीही व्यक्त केली. अशा परिस्थितीत मनसैनिकांना कोणत्याही अडचणीत न टाकण्याचा निर्णय घेत अयोध्या दौरा रद्द केल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. 

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांचा तीव्र विरोध होता. उत्तर भारतीयांची माफी मागा आणि मगच अयोध्याला या अशी ब्रिजभूषण सिंग यांची अट होती. राज ठाकरेंच्या या विधानानंतर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली होती. मी सांगितले ते सत्य ठरले. अयोध्येत गेलो असतो तर केसेस टाकल्या असत्या. कोणी? योगी सरकारने.. तीथे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नाही. विरोध करणारा भाजपाचाच हा ट्रॅप महाराष्ट्रातील भाजपानेच रचला, हे राज ठाकरे यांचंही मत आहे, असं सचिन सावंत म्हणाले. 

पक्षाच्या सांगण्यावरूनच मी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करत आहे, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील बृजभूषण सिंह यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपची चांगलीच कोंडी झाली असून राज ठाकरेंविरोधात ट्रॅप भाजपचाच असल्याची चर्चा सुरु आहे आणि बृजभूषण सिंह यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर भाजपची खिल्ली उडवली जात आहे.

भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात हे वक्तव्य केलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षाचे काम म्हणून राज ठाकरेंना विरोध करत असल्याची कबुली दिली. ते म्हणाले की, मी 6 वेळा खासदार आहे. एकदा माझी पत्नीही खासदार होती. अशा प्रकारे मी सात वेळा माझ्या प्रदेशाचे प्रतिनिधित्व करत आहे. आम्हाला कोणी का नाकारेल? , असे बृजभूषण सिंह यांनी सांगितले. तसेच, तुम्ही पक्षाच्या सांगण्यावरून राज ठाकरेंना विरोध करत आहात? असा सवाल करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, मी पक्षाचे काम करतो. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील भाजप नेते तोंडघशी पडले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here