मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्यावरून दिला होता सल्ला

0

औरंगाबाद,दि.२५: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दसरा मेळाव्यावरून सल्ला दिला होता असा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी गौप्यस्फोट केला. दादरच्या शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळावी यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात वाद सुरू होता. कायदा सुव्यवस्थेचं कारण देत मुंबई महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारली. मात्र त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. ज्याठिकाणी उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली. शिंदे-ठाकरे गटातील या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सल्ला दिला होता मात्र तो ऐकला नसल्याने ही वेळ आली असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी गौप्यस्फोट केला. 

मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले की, दसरा मेळाव्याबाबत आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंनी हा मेळावा घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर राज ठाकरेंना मी विनंती केली होती. तेव्हा वर्षानुवर्षे दसरा मेळावा-बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क हे समीकरण घट्ट आहे आणि यात समीकरणात आपण जाणं हे कोतेपणाचं लक्षण ठरेल. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी मी फारसा उत्सुक नाही असं राजसाहेबांनी म्हटलं असे त्यांनी सांगितले. 

तसेच दसरा मेळाव्याबाबत शिवाजी पार्कचं राजकारण करणं हे कोतेपणाचं ठरेल असं राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना सांगितले होते. राज ठाकरेंनी दिलेला सल्ला किती योग्य होता आणि राज ठाकरेंसोबत बाळासाहेबांचं नातं हे दिसून येते. दसरा मेळावा उद्धव ठाकरेंनी आनंदाने घ्यावा. विनाकारण मनसेला टीकेचे लक्ष्य केले जाते हे करू नका असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, हायकोर्टानं शिवसेनेला मेळावा घेण्याची परवानगी दिली त्यानंतर लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेली हे दिसून आले. हा वाद निर्माण झाला नसता तर मेळावा व्हायचा तो सहजासहजी झाला असता. शिंदे गटानं प्रसिद्धी दिली. संजीवनी मिळाल्यासारखं शिवसैनिक एकमेकांना पेढे वाटत होते. खचलेली मानसिकता होती त्यात हायकोर्टाच्या निकालानं ऑक्सिजन मिळाल्यासारखं झालं असंही प्रकाश महाजन यांनी सांगितले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here