मुंबई,दि.6: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) , भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) शिवसेनेचा गट यांच्यातली जवळीक गेल्या काही दिवसांपासून वाढत चालली आहे, त्यातच आता राज ठाकरे यांनी अचूक टायमिंग साधलं आहे. राज ठाकरे सुमारे 40 मिनिटं मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावर होते. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. आज राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
काही वेळापूर्वीच राज ठाकरे आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे होते. याशिवाय मनसे आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई हेही असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे वर्षा बंगल्यावर जवळपास 40 मिनिटं होते. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढत असल्याने विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.
वर्षा बंगल्यावर आज भाजप आमदार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेते तसंच आमदारांच्या स्नेहभोजनाचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या काही वेळ आधीच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आले आहेत. आता राज ठाकरे भाजप-शिवसेनेच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी दीड दिवसांचा गणपती बसवण्यात आला होता. गणपतीच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं होतं. यावेळी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात सुमारे 45 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे गट आणि मनसे यांच्यात युतीसंदर्भात यावेळी चर्चा झाली असावी, असे तर्क लावण्यात आले होते.