अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपाने माघार घेतल्यानंतर मनसे नेत्याचे ट्विट चर्चेत

0

मुंबई,दि.१८: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपाने माघार घेतल्यानंतर मनसे नेत्याचे ट्विट चर्चेत आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेने (ठाकरे गट) ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी दिली आहे. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून भाजपच्या मुरली पटेल यांनी माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे सध्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गोटात आनंदाचे वातावरण आहे.

मात्र, अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्याचे श्रेय सर्वस्वी राज ठाकरे यांचे असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नेत्यांकडून केला जात आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अमेय खोपकर यांनी ‘राजसाहेब ठाकरेंनी अंधेरीची निवडणूक एकहाती जिंकली’, असे म्हटले आहे. खोपकर यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आदल्या दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहले होते. त्यांच्या या पत्रामुळे २४ तासांमध्ये अंधेरी पोटनिवडणुकीची राजकीय समीकरणे बदलली होती. रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके बिनविरोध निवडून जाणे, हे महाराष्ट्राच्या परंपरेला आणि संकेताला धरून आहे. त्यामुळे भाजपने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली होती. या पत्रानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीच्या रिंगणातून मुरजी पटेल यांना माघार घेण्याचे आदेश दिले होते.

भाजपच्या या निर्णयानंतर राज ठाकरे यांनीही भाजपच्या भूमिकेचं स्वागत केले होते. अंधेरी (पूर्व) पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. उमद्या राजकीय संस्कृतीसह राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी हीच आमची धारणा, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here