कणकवली,दि.७: मनसे नेते अमित ठाकरेंनी (Amit Thackeray) भाजपाचे नेते आमदार नितेश राणेंची (Nitesh Rane) भेट घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे हे पक्षबांधणीच्या कामानिमित्त जनसंपर्क अभियानाअंतर्गत सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे हे पक्षाच्या विद्यार्थी सेनेअंतर्गत तरुणांशी संवाद साधत आहेत. याच दौऱ्यादरम्यान काल अमित ठाकरे थेट भाजपाचे आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंची भेट घेतली. थेट राणे कुटुंबियांच्या घरी जाऊन अमित यांनी ३० मिनिटं चर्चा केल्याने नव्या राजकीय समिकरणांच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र असं असतानाच नितेश राणेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या भेटीसंदर्भातील सविस्तर स्पष्टीकरण दिलंय.
नितेश राणे यांनी ट्विटरवरुन एका फोटो पोस्ट केला. हा फोटो राणे कुटुंबियांच्या कणकवलीमधील घरातील आहे. फोटोमध्ये नितेश राणे अमित यांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहे. अमित यांच्या खांद्यावर भगव्या रंगाची शाल दिसत आहे. नितेश यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनही चांगलीच चर्चेत आहे. नितेश यांनी हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये, “आम्ही भगवाधारी” असं म्हटलंय. भाजपा आणि मनसेचा अजेंडा हा हिंदूत्वाचाच असल्याचं यामधून नितेश यांना अधोरेखित करायचं आहे.
“राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आमचे राजकारणाच्या पलिकडे संबंध आहेत. बाळासाहेबांचे सगळे गुण जसे राज ठाकरेंनी घेतलेत तसे राज ठाकरेंचे सर्व गुण अमित ठाकरेंनी घेतलेत, अगदी आवाजासकट,” असं नितेश राणेंनी या भेटीसंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलंय.
“ते या राजकीय परिस्थितीमध्ये तालुकानिहाय फिरतायत. लोकांशी भेटतायत, जनसंपर्क वाढवतायत. ही चांगली गोष्ट आहे. आमचं कौटुंबिक नातं असल्याने आणि ते माझ्या कणकवलीमध्येच आले असल्याने आम्ही जसे राज ठाकरे आल्यावर त्यांना घरी बोलवतो तसं अमित ठाकरेंनाही बोलावलं होतं,” असं नितेश राणेंनी सांगितलं.
ही भेट ३० मिनिटांची होती. ही केवळ शुभेच्छा देण्यासाठी होती की काही राजकीय चर्चा पण झाली असा प्रश्न नितेशा राणेंना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “नाही नुसत्या शुभेच्छा देण्यासाठी आणि कौटुंबिक चर्चा होती, बाकी काही नाही. आम्ही वर्षानुवर्ष लहानपणी एकत्र खेळलेलो आहे. वर्षानुवर्षांचे संबंध आहेत. त्यामुळे केवळ कौटुंबिक आणि मित्र म्हणून आमच्यात चर्चा झाली,” असं नितेश राणेंनी म्हटलंय.