पुणे,दि.२: दुकानांच्या इंग्रजी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक झाली. पुण्यातील मनसैनिकांनी जंगली महाराज रस्ता, टिळक रस्त्यावरील इंग्रजी अक्षरात लिहिलेल्या दुकानांच्या पाट्या फोडल्या, सुमारे ५० दुकानांच्या पाट्या यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या. यावेळी काही मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसे नेते बाबू वागस्कर यांच्या नेतृत्वात हे खळखट्याक आंदोलन पुण्यात करण्यात आले. तोडफोडीच्या घटनेनंतर कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी पोलीस शास्त्री रस्त्यावरील मनसेच्या कार्यालयात गेले मात्र तिथे त्यांना कोणी सापडले नाही.
पोलीस उपायुक्त संदीप गिल म्हणाले,आता पर्यंत ७ ते ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन संबंधितांवर कारवाई केली जाईल. शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनाही ताब्यात घेतले आहे. परवानगी नसताना हे आंदोलन करण्यात आले आहे.