MNP : मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी TRAI ने दिले ‘हे’ आदेश

0

MNP : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने (TRAI) मंगळवारी टेलिकॉम ऑपरेटर्सना (Telecom operators) मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी (MNP) महत्वाची सूचना केली आहे. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीबाबत (Mobile number portability) टाळाटाळ करणाऱ्या दूरसंचार कंपन्यांविरोधात (Tlecom Companies) दूरसंचार नियामकाने कठोर भूमिका घेतली आहे. ट्रायने (TRAI) सर्व दूरसंचार कंपन्यांना पोर्टेबिलिटीबाबत लादलेल्या अटी तात्काळ हटवण्यास सांगितलं आहे.

देशातील टेलिकॉम कंपन्यांनी मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी (MNP) त्वरीत एसएमएस (SMS) सुविधा सुरू करावी, असं ट्रायनं सांगितलं आहे. ही सुविधा सर्व मोबाइल वापरकर्त्यांना देण्यात यावी असं देखील सांगण्यात आलं आहे. याचाच अर्थ एखाद्या ग्राहकानं आपल्या क्रमांकावर कुठल्याही प्रकारचा रिचार्ज केलेला नसेल, तरी त्याला ही सुविधा मिळणार आहे. नेटवर्क पोर्टेबिलिटीबाबत ट्रायनं जाहीर केलेली ही सूचना महत्त्वाची मानली जात आहे.

काही टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) ग्राहकांना ‘प्रीपेड व्हाउचर’मध्ये ‘आउटगोइंग एसएमएस’ सुविधा उपलब्ध करून देत नसल्याच्या तक्रारी ट्रायकडे आल्या होत्या. त्यानंतर ट्रायनं अशा कंपन्यांच्या सेवा धोरणांवर आक्षेप नोंदवला आहे. ट्रायच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांच्या प्रीपेड खात्यांमध्ये पुरेशी रक्कम असूनही त्यांना ‘मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी’ सुविधेचा लाभ घेताना अडचणी येत आहेत. पोर्टेबिलिसाठी आवश्यक असलेला युनिक पोर्टिंग कोड (Unique porting code) मिळवण्यासाठी निश्चित केलेल्या 1900 या क्रमांकावर त्यांना एसएमएस पाठवता येत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक तक्रारी ट्रायकडे आल्या आहेत.

TRAI ने दिल्या या सूचना

ट्रायनं जाहीर केलेल्या आपल्या सूचना पत्रात म्हटलं आहे की, ‘ग्राहकांना सेवा देणाऱ्या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी, मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी रेग्युलेशन, 2009 (Mobile Number Portability Regulation, 2009) अंतर्गत प्रीपेड (Prepaid) आणि पोस्टपेड (Post-paid) अशा दोन्ही श्रेणीतील मोबाइल फोन पोर्टेबिलिटी सुविधा द्याव्यात. ग्राहक वापरत असलेल्या व्हाउचरची किंमत विचारात न घेता, सर्वांना यूपीसीसंबंधित एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली जावी. प्रीपेड व्हाउचर किंवा प्लॅनमध्ये मोबाइल नंबर पार्टेबिलिटीशी संबंधित एसएमएस पाठवण्याच्या सुविधेची तरतूद न करणं हे नियमांचं उल्लंघन असल्याचं ट्रायनं म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here