Suhas Kande: आमदार सुहास कांदे यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

0

नाशिक,दि.22: बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचे उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केले आहेत. राज्याचे माजी पर्यटन मंत्री तथा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा नाशिकमध्ये (Aaditya Thackeray in Nashik) धडकणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) हे निवेदन देणार आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशामुळेच एकनाथ शिंदे यांना सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आली असल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. या दरम्यान गडचिरोलीतून नक्षलवाद्यांकडून शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्यानंतर गृहविभागाने शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा आमदार कांदे यांनी केला.

एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास त्यावेळेस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती, असा दावाही सुहास कांदे यांनी केला.

एका मराठी माणसाला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिली गेली, तरीदेखील त्यांची सुरक्षा व्यवस्था का नाकारण्यात आली. मात्र, जे हिंदुत्वाविरोधात होते, त्यांना सुरक्षा व्यवस्था का दिली असा सवालही त्यांनी केला. याकूब मेननच्या फाशीला विरोध करणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या अस्लम शेख, नवाब मलिक यांच्यासोबत सत्तेत बसायचे का, असा सवालही त्यांनी केला.

सुहास कांदे ‘माझं काय चुकलं’ या आशयाखाली मतदारसंघातील कामांची यादी आणि हिंदुत्व या विषयावरून शिवसेना कशी दूर गेली याबाबतचा पत्रात उल्लेख करणार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here