अजित पवार विमान अपघात, रोहित पवार यांचा गंभीर आरोप 

0

मुंबई,दि.१३: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठा दावा केला आहे. अजित पवार यांनी रस्ता मार्गे न जाता विमानानेच प्रवास करावा यासाठी 27 जानेवारी रोजी जाणीवपूर्वी विलंब घडवला गेला, असा आरोप रोहित पवारांनी केला. नरेश अरोरा यांचे कंत्राट कायम रहावे यासाठी सुनील तटकरे दादांना भेटायला गेले होते असा अंदाज असल्याचा रोहित पवार यांनी म्हटले. (MLA Rohit Pawar On Ajit Pawar Aeroplane Crash)

नरेश अरोरांच्या कंत्राटावरून अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात वाद झाला होता, असा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. नरेश अरोरांचे कंत्राट रद्द करण्यावरून हा वाद झाला होता असे रोहित पवार म्हणाले. नरेश अरोरा यांचे कंत्राट कायम रहावे यासाठी सुनील तटकरे दादांना भेटायला गेले होते असा अंदाज असल्याचे रोहित पवार आज म्हणाले. त्यावेळी चर्चा लांबल्यामुळेच उशीर झाला आणि दादांना नाइलाजास्तव विमान बुक करावे लागले, असे रोहित पवार म्हणाले. या सर्व प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हावी, या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

रोहित पवार यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याआधीच रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला होता. अजित पवार यांना उशिर का झाला होता? यामागचे कारण सांगताना त्यांनी थेट पूर्व विदर्भातील नेत्याचे नाव घेतले होते.

पक्षाचे राजकीय सल्लागार म्हणून नरेश अरोरा यांना अजित पवार यांनी काही नेत्यांच्या सांगण्यावरून कंत्राट दिले होते. अरोरांचे कोटय़वधींचे कंत्राट दादांना रद्द करायचे होते. पक्ष कन्सल्टन्सीवर चालत नाही, त्यांना फक्त सर्व्हेपुरते मर्यादित ठेवा, असे दादांचे मत होते. बारामतीमध्ये एका प्रसंगात दादांनी अरोरांच्या लोकांना झापलेही होते. मात्र पक्षातील काही नेते मंडळी अरोरांच्या बाजूने होते असे सांगत रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. त्या बैठकीत त्याबाबत चर्चा झाली होती. अरोरा यांच्या कन्सल्टन्सीने विमान विकत घेतल्याची बाब चर्चेत होती. कदाचित याच कारणावरून वाद झाला असावा, अशी शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here