सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर शिंदे गटाच्या आमदाराची पहिली प्रतिक्रिया

0

मुंबई,दि.18: सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर शिंदे गटाच्या आमदारानी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेल्या आदेशावर शिवसेना शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी आजच्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली.

सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टाने सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर 11 मे ला विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेच्या प्रकरणावर ठराविक वेळत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. पण कोर्टाच्या आदेशाचा आदर केला गेला नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टाने आता विधानसभा अध्यक्षांना एक आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर शिंदे गटाच्या आमदाराची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी सुप्रीम कोर्टात आज पार पडलेल्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली. “शंभर दोषी सुटले तरी चालतील मात्र एका निरापराधाला शिक्षा होऊ नये, असं न्यायालयाचे एक वाक्य आहे. त्यानुसारच विधानसभेचे अध्यक्ष सत्ता संघर्षाबाबत निर्णय घेतील”, अशी अपेक्षा शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली आहे.

“शिंदे गटातील 40 आमदार हे सुरक्षित आहेत. शिवसेनाही आमचीच आहे. शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील शिक्कामोर्तब केलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे 14 आमदार हे शिवसेनेतून बाहेर असल्यामुळे कारवाई होणारच असेल तर त्यांच्यावर होईल”, असं मत आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केल आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता…

“शिवसेना आमचीच आहे. आम्ही कुठल्याही दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांचा निर्णय देखील आमच्या बाजूने लागेल”, असा विश्वास आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला आहे. “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता, ते फ्लोअर टेस्टला सामोरे गेले असते, आणि या ठिकाणी जर आम्ही चुकीच्या बाजूने मतदान केलं असतं, यानंतर आमच्यावर कारवाई झाली असती तर ते आम्हाला मान्य असतं”, असंही यावेळी आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here