साडेतीन कोटीची फसवणूक प्रकरण आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.१३: साडेतीन कोटीची फसवणूक प्रकरणात न्यायालयाने आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दि. ३०/०७/२०२४ रोजी फिर्यादी योगेश नागनाथ पवार यांनी संत सेवालाल निधी लि. सोलापूर या फायनान्समध्ये स्वतःचे नावे रक्कम रु.५०,०००/- व इतर ठेवीदार यांनी मिळून ३ कोटी ५९ लाख इतकी रक्कम गुंतवणूक केली होती. 

सदरची रक्कम आरोपी व फायनान्सचे संचालक यांनी फिर्यादीस परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी सदर बझार पोलीस स्टेशन, सोलापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

यात हकीकत अशी की, यातील फिर्यादीस संत सेवालाल निधी लि. या फायनान्सचे संचालक शिवाजी जाधव यांनी फायनान्समध्ये गुंतवणूक करण्यास व गुंतवणूकीतून मिळणाऱ्या ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून सदर फायनान्समध्ये फिर्यादीस सन २०२२ मध्ये रु.५०,०००/- इतकी रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितली. 

ॲड. मिलिंद थोबडे

तसेच फिर्यादी व इतर ७१ गुंतवणूकदारांनी मिळून ३ कोटी ५९ लाख इतकी रक्कम गुंतवणूक केली व गुंतवणूकदारांना फायनान्सच्या संचालकांनी गुंतवणूक केलेल्या ठेवी परत न करता त्यांची फसवणूक केली. त्यावरुन फायनान्सचे संचालक व आरोपी सचिन किसन चव्हाण यांचेविरुध्द सदर बझार पोलीस स्टेशन गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यामुळे आरोपी सचिन चव्हाण यांचेमार्फत जिल्हा न्यायालय, सोलापूर येथे अटकपूर्व जामीन मिळणेकामी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला.

सदर अटकपूर्व जामीनाच्या अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲड. मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात यातील आरोपी हा कोणत्याही प्रकारे फायनान्सशी संबंधीत नाही अथवा तो संचालक नाही. केवळ आरोपी हा मुख्य संचालकाचा जावई असल्यामुळे खोटा गुन्हा नोंद केल्याचा युक्तीवाद केला. त्यावरुन सदर आरोपीचा जिल्हा न्यायाधिश वाय.ए. राणे यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

यात आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. सतिश शेटे यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲड. दत्तुसिंग पवार यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here