मी पुन्हा येईन वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

0

मुंबई,दि.21: महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. या राजकीय अस्थिरतेकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. राजकारणात घडत असलेल्या अनपेक्षित गोष्टी आता पडद्यावरसुद्धा पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांना विचार करायला लावणाऱ्या ‘मी पुन्हा येईन’ या राजकीय पार्श्वभूमीवर आधारित वेबसीरिजचा ट्रेलर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

29 जुलैपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव, भारत गणेशपुरे अशी तगडी स्टारकास्ट आहे. ट्रेलरमधील जबरदस्त संवाद, विनोदी किस्से प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारे आहेत. राजकारणातील अस्पष्ट बाजूचे व्यंगात्मक चित्रण पहिल्यांदाच मराठी सीरीजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न ‘मी पुन्हा येईन’मधून करण्यात आला आहे.

प्रत्येक क्षणी डोळ्यांत अंजन टाकणारी, विचार करण्यास भाग पाडणारी ही वेबसीरिज प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी आहे. राजकारणातील सत्तानाट्याभोवती फिरणाऱ्या या कथानकात कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीने, विनोदाची अचूक वेळ साधत अधिकच रंगत आणली आहे.

याबाबत बोलताना प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’ आम्ही नेहमीच आमच्या ओटीटीवर उत्तमोत्तम आणि नवीन आशय देण्याच्या प्रयत्न केला आहोत. ‘मी पुन्हा येईन’ ही मराठी वेबविश्वासाठी एक वेगळी संकल्पना आहे आणि मला या गोष्टींचा विशेष आनंद आहे की, ही मनोरंजनात्मक सीरीज प्रेक्षकांना प्लॅनेट मराठीवर पाहाता येणार आहे.

‘मी पुन्हा येईन’ बद्दल लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणतात, ‘’ प्रेक्षकांची प्रतिक्रिया ही सर्वोत्तम प्रतिक्रिया असते. आता ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतात, हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. बहुमतासाठी पक्षाची चाललेली धडपड, आमदारांची पळवापळवी, कारस्थाने सत्तेसाठी कोणत्या थराला जातात, याचे गंमतीशीर चित्रण ‘मी पुन्हा येईन’मध्ये पाहायला मिळणार आहे.

राजकारणाचे काही खरे नाही, हेच खरे आहे, हे हसतखेळत सांगणारी ही सीरीज आहे. मला खात्री आहे, हे कथानक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईलच याशिवाय यातील मनोरंजक ट्विस्ट्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतील.’’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या वेबसीरिजचे सह दिग्दर्शक यश जाधव असून निर्माते गौतम कोळी आहेत. तर या बेबसीरिजची निर्मिती जेम क्रिएशन्सने केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here