Vinayak Kondyal: महापौर विनायक कोंड्याल यांचा मोठा निर्णय 

0
विनायक कोंड्याल

सोलापूर,दि.१५: सोलापूरचे (Solapur) महापौर विनायक कोंड्याल (Vinayak Kondyal) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोंड्याल यांच्या निर्णयामुळे लाखो सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा. त्याचबरोबर रात्री-अपरात्री पाणीपुरवठा केला जाऊ नये. यासंदर्भात तातडीने नियोजन करावे असे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी महापालिका आयुक्तांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. लवकरच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी तसेच याबाबत अनुभवी तज्ञ असलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांची तातडीची बैठक महापौर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

सोलापूर शहराला सध्या तीन ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहराच्या हद्दवाढ भागात पाच दिवसाआड तर काही ठिकाणी अधिक दिवसाने पाणीपुरवठा होतो. तसेच हद्दवाढ भागात व शहरातील काही भागातही रात्री-अपरात्री पाणीपुरवठा केला जात असल्याने महिलांसह नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. त्याचा परिणाम नोकरी, रोजगार आणि इतर गोष्टींवर होतो. यामुळे नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा तसेच किमान दोन दिवसाआड तरी पाणीपुरवठा शहराला केला जावा. या अनुषंगाने महापौर विनायक कोंड्याल यांनी निश्चय केला आहे. 

दरम्यान, या संदर्भात प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. लवकरच महापौर कक्षात या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक महापौर विनायक कोंड्याल यांनी बोलावली आहे. लवकरच शहरातील पाणीपुरवठ्याचे नवे वेळापत्रक तयार करण्यात येणार असल्याचे दिसून येते.

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचीही मदत घेणार: महापौर कोंड्याल 

सोलापूर शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा झाला पाहिजे. पाणीपुरवठा सुरळीत आणि आवश्यक त्या दाबाने केला जावा. नागरिकांची गैरसोय टाळावी. यासाठी महापालिका पाणीपुरवठा अधिकारी तसेच यासंबंधीत निवृत्त अनुभवी व तज्ञ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. यापूर्वी शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्याचप्रमाणे सध्याही शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे या संदर्भात महापालिका आयुक्तांना आदेश दिले आहेत. तातडीने बैठकही बोलावली आहे, अशी माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here