महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज होणार निवडणूक 

0
विनायक कोंड्याल

सोलापूर,दि.६: सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होणार आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपचे ८७ उमेदवार विजयी झाले आहेत. १०२ जागांवर भाजपने उमेदवार उभे केले होते त्यात भाजपचे ८७ जण विजयी झाले. महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज शुक्रवारी निवडणूक होणार असून विरोधी पक्ष निवडणुक लढवण्यावर ठाम असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. आज सकाळी ११ वाजता महापालिका आवारातील कौन्सिल हाँलमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली आहे.

या सभेत पिठासीन अधिकारी गणेश निराळी यांच्या अध्यक्षतेखाली महापौर तसेच उपमहापौर पदाची निवडणूक होईल. खबरदारीचा उपाय म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तब्बल सहा वर्षे एक महिना दोन दिवसानंतर ही निवडणूक होत असल्यामुळे उत्सुकता वाढली आहे. 

नगरसचिव प्रविण दंतकाळे हे सुरुवातीला महापौर पदासाठी आणि नंतर उपमहापौर पदासाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज निराळी यांचेकडे सादर करतील. दोन्ही पदाच्या निवडीची प्रक्रिया सारखीच आहे. पिठासीन अधिकारी आधी महापौर पदाची निवडणूक घेतील. उमेदवारी अर्जांची छाननी करुन मंजूर उमेदवारांची नावे जाहीर करतील. नंतर अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात येईल. एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज असतील तर मतदान प्रक्रिया राबवण्यात येईल.

वर्णक्रमानुसार मतदान घेतले जाणार आहे. हात उंच करुन सदस्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येईल. मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाईल. एकच अर्ज असेल तर बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात येईल. नंतर उपमहापौर पदासाठीदेखील अशीच प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून जेष्ठ नगरसेवक विनायक कोंड्याल, एमआयएमचे तौफिक हत्तुरे, शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून प्रियदर्शन साठे हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. उपमहापौर पदासाठी भाजपकडून ज्ञानेश्वरी देवकर,एमआयएमचे आसीफ अहमद शेख आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रियदर्शन साठे निवडणूक लढवत आहेत.

१०२ सदस्य असलेल्या महापालिका सभागृहात भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक म्हणजे ८७ सदस्य आहेत. एमआयएमचे ८, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे ४, काँग्रेसचे २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १ सदस्य आहे. संख्याबळ नसल्यामुळे एमआयएम पक्ष माघार घेऊन मतदानावेळी तटस्थ राहणार का या प्रश्नाचे उत्तर उद्याच मिळेल.

शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी या निवडणुकीत चमत्कार घडेल आणि प्रियदर्शन साठे निवडून येतील असा दावा केला आहे. काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी साठे यांना यापूर्वीच पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे दिसते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भाजप नेत्यांना आशा होती, मात्र विरोधी पक्षाच्या भुमिकांमुळे ती शक्यता मावळली आहे.

सोलापूरच्या मतदारांनी आम्हाला प्रचंड बहुमत दिले आहे. त्यामुळे आमचे दोन्ही उमेदवार अगदी सहज निवडून येतील अशी आम्हाला खात्री वाटते. त्यामुळे आम्ही बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केलेच नाहीत असे भाजपच्या शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सांगितले. याबाबतीत कोणत्याही विरोधी पक्षाबरोबर चर्चा करण्याची गरज वाटली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here