सोलापूर,दि.१०: NCERT कडून इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्यात आला आहे. या निर्णयावर संभाजी ब्रिगेडने तीव्र आक्षेप नोंदवला असून, भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून मूळ नकाशा पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
नेमका वाद काय?
मिळालेल्या माहितीनुसार, NCERT च्या अभ्यासक्रमात सुरुवातीला मराठा साम्राज्याचा विस्तृत नकाशा होता. मात्र, काही घटकांनी तत्कालीन राजपूत राज्ये नकाशामध्ये दाखवल्याबद्दल विरोध दर्शवला. त्यानंतर नकाशात बदल करून काही राज्ये वगळण्यात आली. या बदलालाही विरोध झाल्यानंतर NCERT ने थेट संपूर्ण नकाशाच अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. या “सोयीस्कर” निर्णयामुळे शिवप्रेमी आणि इतिहासकारांमध्ये नाराजी पसरली आहे.
मराठ्यांचा उत्तर भारतातील पराक्रम: ऐतिहासिक पुरावे
संभाजी ब्रिगेडने आपल्या निवेदनात मराठा साम्राज्याच्या उत्तर भारतातील प्रभावाचे दाखले दिले आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांनी दिल्ली आणि अटकेपार झेंडे फडकवले होते, हे सांगताना त्यांनी खालील युद्धांचा संदर्भ दिला आहे:
• रामपुरा मोहीम (१७३४-३५): मराठ्यांचा लष्करी विजय.
• बुंदी मोहीम (१७३०): मराठ्यांच्या हस्तक्षेपामुळे गादीची पुनर्स्थापना.
• कक्कोरचे युद्ध (१७५९): जयपूरच्या सैन्यावर मिळवलेला विजय.
• पाटन (१७९०) व मेर्टा युद्ध (१७९०): महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे जयपूर आणि जोधपूरचा पराभव.
• मालपुरा युद्ध (१८००): उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व सिद्ध करणारे युद्ध.
इतिहास दबावाखाली बदलू नका: संभाजी ब्रिगेड
“मराठ्यांचा इतिहास हा केवळ भूतकाळ नसून तो स्वाभिमान आणि राष्ट्ररक्षणाची प्रेरणा आहे. राजकीय किंवा अन्य कोणत्याही दबावाखाली पुराव्यांवर आधारित इतिहास पुसून टाकणे हे दुर्दैवी आहे,” असे मत संघटनेने व्यक्त केले आहे. भावी पिढीला सत्य इतिहास कळावा यासाठी तो मूळ स्वरूपातच पाठ्यपुस्तकात असावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, ॲड. गणेश कदम, इशरत नागोरे, फिरोज सय्यद, जैनुद्दीन नदाफ आणि असद नागोरे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.








